सालकऱ्यांच्या शोधार्थ बळीराजाची भटकंती
By Admin | Updated: March 20, 2015 01:44 IST2015-03-20T01:44:25+5:302015-03-20T01:44:25+5:30
गुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात.

सालकऱ्यांच्या शोधार्थ बळीराजाची भटकंती
विजय माहुरे घोराड
गुढीपाडवा तोंडावर आला आहे. या दिवशी शेतकरी त्यांच्या शेतात वर्षभर काम करण्यासाठी सालकऱ्याची नियुक्ती करतात. यंदा मात्र गावातील सोडा जिल्ह्यातील सालकरी मिळणे कठीण झाले आहे. शेतात वर्षभर काम करण्याकरिता आवश्यक असलेल्या सालकऱ्याच्या शोधात शेतकरी जिल्ह्यात व परजिल्ह्यात फिरत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांच्या नववर्षाला गुढी उभारून होत आहे. काही गावात होळी ते मांडवस या काळात वार्षिक मजुरी ठरवून सालकरी म्हणून ठेवण्याची प्रथा आहे, तर तालुक्यातील काही गावात गुढीपाडव्याला नवा सालकऱ्यांचे वार्षिक वेतन ठरवून कामावर शेतमजूर म्हणून रूजू करण्यात येते. सेलू तालुक्यात बागायती शेती असल्याने सालकरी म्हणून राहणाऱ्यांची संख्या कमी आहे. गत काही वर्षाअगोदर छत्तीसगड येथून बहुतांश परिवार रोजगार मिळविण्यासाठी येथे आले होते. ते काही वर्ष येथे राहून रोजमजुरी करायचे. सध्या ते त्यांच्या राज्यात परत गेले. नंतर गोंदिया, भंडारा व बालाघाट या भागातील काही परिवार या तालुक्यात रोजगाराकरिता आले. तेव्हा शेतावरील काम करण्यासाठी मजूर सहज मिळू लागले होते. आता मात्र चित्र बदलले आहे.
गत पाच वर्षांच्या काळात मजुरांना सालकरी म्हणून मिळणाऱ्या वेतनापेक्षा विहिरीवरील कामावर, ट्रॅक्टरवरील कामात, तसेच नवनवीन बांधकामावर काम केल्यास अधिक मजुरी मिळू लागली. युवा मजुरी करणाऱ्यांचा कल शेतीकडून दूर झाला. तालुक्यात सुरू असलेल्या मनरेगामुळे मजुरांची शेतावरील कामाकरिता चणचण भासू लागली आहे. सुरू वर्षांत ७० ते ८० हजार रुपये वार्षिक मजुरी सालकऱ्यांची होती. यात कमी जास्त वेतन असले तरी महिन्याला ५ कुडव ८४० पायली गहू देण्याची प्रथा आहे.
यावर्षी अस्मानी व सुलतानी संकटामुळे आर्थिकदृष्ट्या हवालदिल असणाऱ्या शेतकऱ्यांपुढे सालकरी ठेवण्याचा प्रश्न कायम असला तरी शेती तर कसावीच लागणार. बैलजोडी ठेवावीच लागणार. सालकऱ्यांची नितांत आवश्यकता असल्याने आपल्या स्वखर्चात कपात करून नव्या सालकऱ्यांच्या शोधार्थ या तालुक्यातील सधन शेतकरी परजिल्ह्यात भटकंती करीत आहेत.