जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर
By महेश सायखेडे | Updated: September 10, 2022 15:07 IST2022-09-10T15:05:58+5:302022-09-10T15:07:27+5:30
२ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा : जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त होताच तालुक्यांना होणार वळत

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांसाठी शुभवार्ता; ३४५.९९ कोटींच्या प्रस्तावावर शासनाकडून मंजुरीची मोहर
वर्धा : यंदा जिल्ह्यात जुलै अन् ऑगस्ट महिन्यांत अतिवृष्टीने कहरच केला. याच अतिवृष्टीमुळे २.५४ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील शेतकऱ्यांची एकूण संख्या २ लाख ३२ हजार ६४६ इतकी असून त्यांना नियमानुसार शासकीय मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४५.९९ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला.
याच प्रस्तावावर अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून शासनाने मंजुरीची मोहर लावली असून आता लवकरच जिल्हा प्रशासनाला हा निधी मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त होताच तो तालुकास्तरावर वितरित होणार आहे. त्यानंतरच शासकीय मदतीची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सर्वाधिक नुकसानग्रस्त शेतकरी समुद्रपूर तालुक्यात
गत दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तालुकानिहाय नुकसानीची स्थिती (हेक्टरमध्ये)
वर्धा : ४०६९३.३३
सेलू : २३९६३.७०
देवळी : ३७२९३.६०
आर्वी : ३००७५.७७
आष्टी : १५०५५
कारंजा : २६३४३.३८
हिंगणघाट : ४५५८७.५२
समुद्रपूर : ३५०८२.१०
वाढीव दराप्रमाणे अपेक्षित तालुकानिहाय निधी
वर्धा : ५५,५०,३७,२८८ रुपये
सेलू : ३२,६०,५७,२९६ रुपये
देवळी : ५०,७२,२८,८०० रुपये
आर्वी : ४१,०१,४२,०९२ रुपये
आष्टी : २०,५२,८५,६०० रुपये
कारंजा : ३५,८२,६९,९६८ रुपये
हिंगणघाट : ६२,०८,२१,७४४ रुपये
समुद्रपूर : ४७,७१,१६,५६० रुपये
नायब तहसीलदार सांभाळणार नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी
* कुठलाही नुकसानग्रस्त शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहून म्हणून तालुका स्तरावर नायब तहसीलदारांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी राहणार आहे. तर सहाय्यक म्हणून मंडळ अधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली जाणार आहे.
* नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात शासकीय मदत वळती होताना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून सोमवारी एलडीएम सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने पूर्व तयारी बैठक घेणार आहे.
अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील २.३२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना वेळीच शासकीय मदत मिळावी म्हणून ३४५.९९ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. या प्रस्तावाला शुक्रवार ९ सप्टेंबरला शासनाने मंजुरी दिली आहे. तर लवकरच जिल्हा प्रशासनाला निधी मिळणार असून निधी प्राप्त होताच तो तातडीने तालुक्यांना वळता होणार आहे.
- राहूल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.