हिवरा गावात गोेट्यांची दहशत कायम
By Admin | Updated: March 30, 2017 00:36 IST2017-03-30T00:36:37+5:302017-03-30T00:36:37+5:30
गत दीड ते दोन महिन्यांपासून हिवरा गावातील काही घरांवर दगड येतात.

हिवरा गावात गोेट्यांची दहशत कायम
अंनिस व पोलिसांनी केली पाहणी : भीतीमुळे महिला होतात आजारी
आकोली : गत दीड ते दोन महिन्यांपासून हिवरा गावातील काही घरांवर दगड येतात. त्यामुळे येथील रहिवाशांत भीतीचे वातावरण आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच अखिल भारतीय अंनिस व पोलीस पथकाने गावाला भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांकडून या प्रकाराविषयी माहिती जाणून घेतली. यानंतर हा प्रकार सुरूच आहे.
अंनिसचे पंकज वंजारे, आशिष मोडक, रवी पुनसे, राहुल देवळीकर, शुभम जळगावकर, सतीश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक विवेक रामटेके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वर्धापूरकर, सागर होले यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधून प्रबोधन केले. घराचे दार, खिडक्या बंद असताना दगड येतात. त्यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. या प्रकाराची माहिती जाणून घेण्यासाठी पोलीस शिपाई रमेश डुकरमारे यांच्या घरी पोहोचले. माहिती घेतानाच महिला शिपायाच्या पायाजवळ दगड येवून पडले. टिनावरून दगड आत येतो, पण टिनाला छिद्र पडत नाही. गावातील युवकांनी रात्री जागरण करुन दगड कुठून येतो याचा शोध घेतला. मात्र त्यानंतर घरात दगड आल्याने येथील रहिवाशी दहशतीत आहे. या प्रकारामुळे निर्मला डुकरमारे या महिलेची प्रकृती बिघडली आहे. गोटमारीच्या या प्रकारामुळे लहान मुले दिवसाला घराबाहेर पडायला धजावत नाही.
विशेष म्हणजे दगड पडतांना दिसतो पण येतो कुठून याचा अद्यापही शोध लागला नाही. कधी-कधी सायंकाळी ५ वाजता सुरू झालेला हा गोटमारीचा प्रकार दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत सुरू असतो. यामुळे या दगडाचा शोध लावण्याचे आव्हान अंधश्रध्दा निर्मूलन समिती व पोलिसांपुढे आहे. अंनिसच्या पथकाने येथे प्रबोधन केले तरी या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी आहे.(वार्ताहर)