ग्रामीण भागातून गोबरगॅस कालबाह्य

By Admin | Updated: June 12, 2016 01:53 IST2016-06-12T01:53:47+5:302016-06-12T01:53:47+5:30

ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना.

Gobar Gas out of rural areas | ग्रामीण भागातून गोबरगॅस कालबाह्य

ग्रामीण भागातून गोबरगॅस कालबाह्य

अनास्था : चारा व पाणी टंचाईमुळे गोधनात घट
पिंपळखुटा : ग्रामीण भागात शेतीच्या कामाकरिता ट्रॅक्टरसह अन्य यंत्राचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. यातच सततचा दुष्काळ असल्याने जनावरांकरिता चारा मिळेना. परिणामी शेतकऱ्यांना पशुधन पाळणे कठीण झाले आहे. पशुधन घटल्याने शेण व शेणखत कमी झाले. यामुळे एकेकाळी महत्त्वाच्या घटक असलेला गोबर गॅस आता ग्रामीण भागातून कालबाह्य होत असल्याचे चिन्ह आहे.
पिंपळखुटा व परिसर हा पशुधनाकरिता ओळखला जातो. यामुळे येथे गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणेही दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. शेती बरोबरच शेतकरी जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय करीत असतो. आजही शेतकऱ्यांजवळ जनावरे आहेत. गुरेढोरे पाळण्याबरोबरच यातून इंधन मिळत होते. त्यामुळे पूर्वी ज्यांच्या घरी शेती आहे अशा बहुतांश शेतकऱ्यांच्या घरी गोबर गॅस पहायला मिळत असे.
पाळीव जनावरापासून दुध व घरगुती वापराकरिता गॅसला इंधन मिळत होते. यामुळे गोबर गॅसचा वापर मोठया प्रमाणावर वाढला होता. पण कालांतराने पाणीटंचाई, चारा समस्या तथा यंत्राचा वापर वाढल्यामुळे पशुधन घटले. शेतीच्या यांत्रिक सामुग्रीत आधुनिकता आल्याने गायी बैलाचा वापर शेतीसाठी कमी प्रमाणात करण्यात येत आहे. चारा टंचाईमुळे जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे शेण मिळत नाही. गोबर गॅस कालबाह्य होत असून त्याची जागा गॅस सिलिंडरनी घेतली आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या घरोघरी असणारे गोबर गॅस आता कालबाह्य झालेले दिसतात.
कमी खर्चात संपूर्ण कुटूंबाकरिता लागत असलेल्या इंधनाची गरज गोबरगॅसमुळे आधी पूर्ण होत असे. त्यातच एलपीजी सिलिंडरचे दर वाढले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना ही बाब न परवडणारी आहे. शासनाने अनुदान देवून ही योजना पुनर्जीवित करण्याची गरज व्यक्त होत आहे. शासनाने याकडे लक्ष देत पशुधन वाढविण्यासाठी तरतुद केल्यास गोबर गॅसकरिता इंधनाची समस्या संपुष्टात येईल. त्यामुळे याकडे नव्याने लक्ष देण्याची गरज ग्रामस्थ व जाणकार व्यक्त करीत आहे.(वार्ताहर)

पशुधन वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज
पशुधनाकरिता ओळख असलेल्या आर्वी तालुक्यात गोबर गॅसची संख्या अधिक होती. मात्र आता शेण मिळणे दुरापास्त होत असल्याने गोबर गॅसचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. परिणामी एलपीजी सिलिंडर वापरावे लागते. हे सिलिंडर महागडे असून अनेकदा खात्यात सबसिडी जमा होत नसल्याने बँकेत चकरा माराव्या लागतात. यात शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. पशुधन वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Gobar Gas out of rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.