शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्या
By Admin | Updated: December 13, 2014 22:44 IST2014-12-13T22:44:11+5:302014-12-13T22:44:11+5:30
सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़

शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत द्या
वर्धा : सोयाबीनने बुडविले आणि कपाशीवरही लाल्याने आक्रमण केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ या शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे़ याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना निवेदन सादर केले़ यावेळी लाल्याने ग्रस्त कपाशीची झाडे त्यांना भेट देण्यात आली़
मनसे जिल्हाध्यक्ष अजय हेडाऊ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना लाल्या रोगाने ग्रासलेली कपाशीची पेंढी भेट दिली़ यावेळी दिलेल्या निवेदनात सततच्या नापिकीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील बळीराजावर दुबार-तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे़ हे सर्व करूनही पीक न आल्याने बळीराजा आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. यंदा कापसाला भाव नाही जिल्ह्यात ६० टक्के शेतकरी कपाशी हे मुख्य पीक घेतात; पण यंदा कपाशी पिकावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे संपूर्ण पीक धोक्यात आले आहे. सोयाबीन बुडाले, कपाशीला लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी शासनाची मदत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतोय़
शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये मदत जाहीर करावी, अन्यथा मनसे शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला़ यावेळी उपाध्यक्ष शंकर पोटफोडे, नितीन अमृतकर, गोलू भुरे, सागर गायकवाड, आशिष धोबे, सचिन लोखंडे, प्रफूल्ल ढगेसह कार्यकर्ते उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)