आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करा
By Admin | Updated: July 2, 2015 02:23 IST2015-07-02T02:23:33+5:302015-07-02T02:23:33+5:30
नैसर्गिक परिस्थितीवर मात करून आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्या,...

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करा
वर्धा : नैसर्गिक परिस्थितीवर मात करून आधुनिक पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती करावी. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्या, असा सल्ला पुण्याचे कृषी आयुक्तालयाचे उपसंचालक रवींद्र ढमाळ यांनी दिला.
विकास भवन येथील कृषी दिन व कृषी मित्रांचे प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. कृषी सभापती श्यामलता अग्रवाल, महिला व बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य स्मीता ढवळे, जि.प. तथा कृषी समिती सदस्य मनोज चांदूरकर, पं.स. सभापती कुंदा भोयर, शेतीनिष्ठ शेतकरी वसंत पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, केम प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक संजय सोनटक्के, आत्माचे प्रकल्प उपसंचालक दीपक पटेल, उपसंचालक जी.आर. कापसे आदी उपस्थित होते.
ढमाळ पुढे म्हणाले की, जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर ही पारंपरिक पिके घेतली जातात; पण सध्याच्या नैसर्गिक परिस्थितीवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करावी. प्रक्रिया उद्योगावर भर देऊन शेती करावी. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातूनही पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘एम-पोर्टल’ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी. पीक वाढीस मदत करणाऱ्या तंत्रज्ञानावर भर देऊन शेतकऱ्यांनी शेती करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
चांदूरकर यांनी विविध कृषी विषयक समस्यांवर भाष्य करतानाच उत्पन्नामध्ये वाढ करताना शेतकऱ्यांची कशी दमछाक होते ते सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनीही प्रयत्न न सोडता उत्पन्नावर आधारित उत्पादन घेण्याचे आवाहन केले. स्मीता ढवळे, चेतना मानमोडे यांनीही शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे जीवनमान उंचावण्यावर भर द्यावा, असे सांगितले.
भाऊ बऱ्हाटे यांनी लवकरच कृषी विभागामार्फत शासकीय योजनांबाबत माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे. या पुस्तिकेत शासनाच्या सर्व योजनांची माहिती राहणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी असेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता आधुनिक पद्धतीने शेती करावी, असे सांगितले.
प्रारंभी माजी मुख्यमंत्री यशवंत चव्हाण, हरितक्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते जागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन व कृषी जागृती सप्ताहाला जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. नेमाडे आणि पेशकर यांनी शेतकऱ्यांना शेतीवरील तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यांच्या शंकांचेही यावेळी निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जि.प. कृषी अधिकारी संजय खळीकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कापसे यांनी मानले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)