विचाराधीन मॉलसाठी पार्किंगवर गंडांतर
By Admin | Updated: April 28, 2015 01:57 IST2015-04-28T01:57:13+5:302015-04-28T01:57:13+5:30
रेल्वे स्थानकावर प्रवासी तसेच अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गाकरिता पार्किंगची व्यवस्था केली जाते़ कित्येक

विचाराधीन मॉलसाठी पार्किंगवर गंडांतर
रेल्वे प्रशासनाचा प्रताप : शेडची व्यवस्था करून न देताच वाहनांचे स्थलांतर; प्रवाश्यांना फेरा
वर्धा : रेल्वे स्थानकावर प्रवासी तसेच अप-डाऊन करणाऱ्या नोकरदार वर्गाकरिता पार्किंगची व्यवस्था केली जाते़ कित्येक वर्षांपासून ही पार्किंग व्यवस्था रेल्वे पोलीस ठाण्याच्या बाजूला करण्यात आलेली होती़ मोकळी व ऐसपैस जागा असल्याने वाहनेही व्यवस्थित राहत होती; पण मॉलच्या नावाखाली ही जागा मोकळी करून घेण्यात आली आहे़ यामुळे वाहन धारक प्रवाश्यांना रेल्वेस्थानकाच्या बाहेर निघून वाहने काढण्यासाठी जावे लागते़ या धावपळीत गाडी निघून जात असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत़
सध्या रेल्वेची पार्किंग व्यवस्था पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस हलविण्यात आली आहे़ या परिसरात जाण्याकरिता रस्त्याची निर्मितीही करण्यात आली नाही़ हा परिसर महिला, युवतींकरिताही सुरक्षित नाही़ रात्रीच्या सुमारास रस्त्यावर रिक्षा चालकांसह मद्यपिंची धूम असते़ शिवाय विविध खाद्यपदार्थांच्या बंड्या लागत असल्याने प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागतो़ कचऱ्याचे उकिरडे असून पोलिसांच्या नजरेपासून दूर असलेला हा परिसर त्रासदायक ठरणारा आहे़ रेल्वे प्रशासन पार्किंगचे कंत्राट देताना लाखो रुपये वसूल केले जातात; पण पार्किंगकरिता विशेष सुविधा पुरविल्या जात नाहीत़ या प्रकारामुळे प्रवासीही त्रस्त झाले आहेत़ पूर्वी पार्किंग व्यवस्था जवळ असल्याने गाडीच्या वेळेवर पोहोचलेल्या प्रवाश्यांना ती पकडता येत होती; पण आता हातचे काम सोडून वेळेपूर्वी रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागत असल्याने तारांबळ उडताना दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)
शेड नसलेल्या पार्किंग व्यवस्थेने अडचण; तिकीट घराजवळील फाटकालाही असते कुलूप
गत कित्येक वर्षांपासून रेल्वे पोलीस ठाण्याच्या शेजारी पार्किंग व्यवस्था होती़ त्या परिसरात शेडचे बांधकामही करण्यात आलेले आहे़ यामुळे वाहन सुरक्षीत राहू शकत होते; पण नवीन स्थलांतरीत जागेवर कुठलीही शेडची व्यवस्था करण्यात आलेली नाही़ यामुळे वाहने दिवसभर उन्हातच असतात़ यात वाहनांचे नुकसान होत आहे़ शिवाय जागाही पूर्वीपेक्षा कमी आणि तोकडी असल्याने वाहने ठेवण्याकरिता जागा राहत नाही़ महिला, युवतींना आपली वाहने हाती धरून आधी जागा शोधत फिरावे लागते़ या प्रकारामुळेही गाडी पकडताना धावपळ करावी लागत असल्याचे दिसते़
शिवाय पेट्रोल पंपाच्या भिंतीलगत रस्त्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात़ यामुळे या वाहनांकडे कुणाचेही लक्ष राहत नाही़ संबंधित कंत्राटदाराने आपल्यापूरते लहान शेड केले; पण त्यातून संपूर्ण वाहनांकडे लक्ष देणे त्यांनाही शक्य होत नाही़ यामुळे शेडची निर्मिती करावी, अशी मागणी वाहन धारकांतून होत आहे़
नवीन पार्किंग स्थळाकडे येण्यासाठी फलाटावरून कुठलाही रस्ता ठेवण्यात आलेला नाही़ तिकीटघराजवळ एक फाटक आहे़ याद्वारे रेल्वेच्या तांत्रिक विभागाकडे जाता येते व येथूनच पार्किंगचे नवीन स्थळही जवळ आहे; पण सदर फाटक नेहमी बंद ठेवले जाते़ या फाटकाला कुलूपबंद ठेवण्यामागील कारण काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़ तिकीटघराबाहेर कर्मचाऱ्यांना वाहने ठेवण्यासाठी जागा दिली आहे़
जबाबदारी कुणाची ?
रेल्वे प्रशासनाच्या पार्किंगचे कंत्राट लाखोर रुपयांचे असते; पण तेथे सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जाते़ ही जबाबदारी संबधित कंत्राटदाराची की रेल्वे प्रशासनाची, हा प्रश्नच आहे़
शेड नाही, पिण्याचे पाणी नाही आणि वाहन ठेवण्याकरिता पूरेसी जागाही नसल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसते़