शिवीगाळ केल्यामुळे मित्रानेच केली गजाननची हत्या
By Admin | Updated: March 15, 2015 01:53 IST2015-03-15T01:53:33+5:302015-03-15T01:53:33+5:30
होळीच्या दिवशी जाम जवळील पंचगव्हात परिसरात गजानन बन्सोडची हत्या झाली होती.

शिवीगाळ केल्यामुळे मित्रानेच केली गजाननची हत्या
समुद्रपूर : होळीच्या दिवशी जाम जवळील पंचगव्हात परिसरात गजानन बन्सोडची हत्या झाली होती. त्याची हत्या त्याच्या मित्रानेच केली असल्याचा खुलासा शुक्रवारी रात्री झाला. या प्रकरणी कुणाल शिवणकर रा. उपरवाही, जि. नागपूर याला अटक करण्यात आली.
समुद्रपूर येथील गजानन गुलाब बन्सोड (३६) याचा मृतदेह पि.व्ही. टेक्सटाईल्सच्या मागे पंचगव्हाण शिवारात आढळून आला. त्याच्या मृतदेहावर असलेल्या जखमांवरून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू असताना मृतकाचा मित्र कुणाल रमेश शिवणकर (२३) याची चौकशी केली असता त्याच्या बयानात तफावत असल्याचे दिसून आली. यावरून त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. कुणाल याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
५ मार्चच्या रात्री गजानन हा नशेत आला असता कुणालशी त्याचा वाद झाला. यात गजानन याने कुणालला पिण्याकरिता पाणी मागितले. तेव्हा तुला पाणी पाहिले असल्यास कॅनलच्या बाजूने येण्यास सांगितले. यावेळी गजानन याने पुन्हा शिवीगाळ केली. यामुळे कुणालने त्याच्या हातातील दांडा त्याला फेकुन मारला. तो त्याच्या डोक्याला लागला.
यावरून दोघोत पुन्हा वाद झाला. जवळ जावून पाहिले असता गजाननच्या डोक्यातून रक्त येताना दिसले. कुणालला वाटले हा आता आपली तक्रार करेल व पोलीस पकडतील, या कारणाने त्याने त्याच काठीने गजाननचा डोक्यावर वार केले. यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
ही कारवाई ठाणेदार जिट्टावार, पोलीस उपनिरीक्षक अशोक माहुरकर, जमादार उमेश हरणखेडे, विरेंद्र कांबळे, बजरंग कुंवर, प्रकाश मैद, चंद्रकांत बुरीले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)