पोलीस बंदोबस्तात ‘त्या’ मातेवर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST2021-09-06T05:00:00+5:302021-09-06T05:00:01+5:30
राणे हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शस्त्रक्रियेद्वारे गौरीची प्रसूती केली असता, तिने मुलीला जन्म दिला. काही वेळाने पोटात दुखायला लागले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. याची माहिती पती अभिजीत डवरे यांनी रुग्णालयातील नर्सला दिली. नर्सनी डॉ.कालिंदी राणे यांना याबाबत माहिती दिली. मात्र, दीड ते दोन तास होऊनही डॉक्टर आल्या नाही. रात्री दहा वाजेदरम्यान प्रकृती जास्तच खालावल्याने राणे हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले.

पोलीस बंदोबस्तात ‘त्या’ मातेवर अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : येथील राणे हॉस्पिटलमध्ये गौरी अभिजीत डवरे रा. नेताजी वॉर्ड या महिलेचा प्रसूतीपश्चात मृत्यू झाला. या घटनेने शहरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. शवविच्छेदनानंतर ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी मृताच्या घरी जाऊन परिवाराचे सांत्वन करीत, सर्वोतोपरी चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर, पोलीस बंदोबस्तात मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिवारासह अख्खा परिसर हळहळला. राणे हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता शस्त्रक्रियेद्वारे गौरीची प्रसूती केली असता, तिने मुलीला जन्म दिला. काही वेळाने पोटात दुखायला लागले आणि रक्तस्त्राव सुरू झाला. याची माहिती पती अभिजीत डवरे यांनी रुग्णालयातील नर्सला दिली. नर्सनी डॉ.कालिंदी राणे यांना याबाबत माहिती दिली. मात्र, दीड ते दोन तास होऊनही डॉक्टर आल्या नाही. रात्री दहा वाजेदरम्यान प्रकृती जास्तच खालावल्याने राणे हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्याला उपजिल्हा रुग्णालयात रक्तासाठी पाठविण्यात आले, पण उपजिल्हा रुग्णालयात रक्त नसल्याने रात्री अकरा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दोन बॉटल रक्त मागविण्यात आले. वर्ध्यातून रक्त पोहोचेपर्यंत प्रसूतेचा मृत्यू झाला. रात्री अडीच ते तीन वाजताच्या सुमारास मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. गौरी ही शहरातील प्रतिष्ठित डेकोरेशन व्यावसायिक रमेश उर्फ बाबा डवरे यांची स्नुषा असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप पती अभिजीत यांनी केला आहे. या घटनेने रुग्णालयासह शहरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. शनिवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेदरम्यान वर्ध्याचे तज्ज्ञ डॉक्टर राजेश कुटे यांच्या देखरेखीत नायब तहसीलदार विनायक मगर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्ज्वला देवकाते, डॉ.संगीता वावरे, अतुल गौरकर यांनी शवविच्छेदन करून, व्हिसेरा नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविला. या सर्वाची व्हिडीओ शूटिंग करण्यात आली. एक दिवसाच्या चिमुकलीची प्रकृती व्यवस्थित असून, तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या महिलेची पाच वर्षापूर्वी पहिली प्रसुती मीच केली होती. ती माझी नियमित पेशंट होती. सर्वोतोपरी प्रयत्न करुनही तिला वाचविण्यात यश आले नाही. झालेल्या घटनेबद्दल अतिशय दु:ख आहे.
डॉ. कालिंदी राणे, प्रसुती तज्ज्ञ, राणे हॉस्पिटल, आर्वी