शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व
By Admin | Updated: November 16, 2016 00:51 IST2016-11-16T00:51:21+5:302016-11-16T00:51:21+5:30
आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे

शताब्दी वर्षातील मित्र मिलन सोहळ्याला आले महत्त्व
तीन दिवस कार्यक्रम : यंदा खुले चर्चासत्र
पवनार : आचार्य विनोबा भावे यांच्या ब्रह्मनिर्वाण तिथीनिमित्त १५, १६ व १७ नोव्हेंबर रोजी मित्र मिलन सोहळ्याचे आयोजन ब्रह्मविद्या मंदिर परमधाम पवनार येथे करण्यात आले आहे. मंगळवारी कार्यक्रमांना प्रारंभ झाला. १९१६ मध्ये विनोबांनी घर सोडून गांधीजींची सोबत केली. याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दी वर्ष म्हणून या मित्र-मिलन सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरवर्षी आयोजित या सोहळ्यात संगोष्ठीचा विशिष्ट विषय ठेवण्यात येतो; पण यंदा खुले चर्चासत्र होणार असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्याची सुरूवात करताना मिनू बहन यांनी उपस्थितांचे शब्द सुमनांनी स्वागत करून वर्षभरात दिवंगत झालेले सर्वोदयी कुसूमताई, नरेंद्र दुबे, कृष्णराज मेहता, नारायणदास जाजू, मुलचंद बडजाते, भवरलाल जैन, पूर्णिमा बेन (१०३वर्षे) बाबूराव चंदावार, लक्ष्मीफुलन, नामदेव झाडे, मुकूंदभाई धुळे, वसंत पळशीकर, आर्यभूषण भारदान, चंद्रशेखर शर्मा ऋषीकेश, हरिजन सेवक डी.एन. बॅनर्नी, शैलेश बंडोपाध्याय, मिराताई भट्ट, निकमभाई यांनी आदरांजली वाहण्यात आली. पाच मिनीट मौन पाळून आचार्य विनोबांना आदरांजली वाहण्यात आली. कांचन बहन यांनी प्रास्ताविकातून विनोबांच्या कार्याला उजाळा दिला.
विनोबांबाबत गांधीजींचे विचार सांगताना, लोक आश्रमात काही घ्यायला येत असतात; पण विनोबा आश्रमला खुप काही द्यायला आला आहे. विनोबा हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी आहे. १९७९ मध्ये विनोबांनी गोवंश हत्याबंदीसाठी उपोषण केले, तेव्हा दादा धर्माधिकारी यांनी विनोबांना हा ईश्वरीय संकेत असल्याचे सांगितले. १४ वर्षे पदयात्रा करीत विनोबांनी भूदान चळवळीला वेगळे महत्त्व प्रदान केले, असेही कांचन यांनी सांगितले. तीन दिवस मित्र मिलन सोहळ्यात अनेक सर्वोदयी विचार व्यक्त करतील. यासाठी देश-विदेशातून अनेक गांधी विचारांचे साधक आश्रमात हजर झाले आहेत.(वार्ताहर)