एसटीच्या उत्पन्नाला मालवाहतुकीचा दे धक्का!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 05:00 AM2020-10-14T05:00:00+5:302020-10-14T05:00:02+5:30

जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.

Freight hits ST's revenue! | एसटीच्या उत्पन्नाला मालवाहतुकीचा दे धक्का!

एसटीच्या उत्पन्नाला मालवाहतुकीचा दे धक्का!

Next
ठळक मुद्देमिळाले ४३ लाखांचे उत्पन्न : चार महिन्यांत १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर धावली एसटी

सुहास घनोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आल्याने परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे वाहतूक उत्पन्न बुडाले. एसटीपासून उत्पन्न सुरू ठेवण्यासाठी एसटीतून मालवाहतूक करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार सुरुवातीला वर्धा आगाराने पाच आणि नंतर बसेस मालवाहतुकीसाठी सुरू केल्या होत्या. यातून महामंडळाच्या उत्पन्नाला बऱ्यापैकी हातभार लागला आहे.
जून ते ऑगस्ट या चार महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागाच्या रित्या झालेल्या तिजोरीत मालवाहतुकीपोटी ४२ लाख ८९ हजार ५८८ रुपयांची भर पडली आहे. या कालावधीत मालवाहतुकीकरिता एसटीच्या ८९९ फेऱ्या झाल्यात. तब्बल १ लाख १६ हजार ९७६ किलोमीटर राज्यांतर्गत मालवाहतूक करणाऱ्या एसटी धावल्या. परिवहन महामंडळाने पंधरवड्यापूर्वी पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू केली आहे. मात्र कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रवाशांचा अद्याप प्रतिसाद नाही. परिणामी, एसटीला तोटा सहन करतच वाटचाल सुरू ठेवावी लागत आहे.
कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने एसटीही बंद ठेवण्यात आली होती. दरम्मान महामंडळाला कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे महामंडळाने एसटीची मालवाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे संकट अजून किती दिवस असणार, हे सांगता येणे अवघड असले तरी कायमस्वरूपी हे संकट राहणार आहे. पर्यायाने प्रवाशांना एसटीची गरज भासणारच आहे. महामंडळाला एसटी बंद ठेवून चालणार नाही. यामुळेच एसटी सुरू राहण्यासाठी रेल्वेप्रमाणे एसटीमधून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार आहेत. या पाचही आगारांतर्गत सद्यस्थितीत २० मालवाहतूक एसटी धावत आहेत. मालवाहतुकीला जिल्ह्यातील कारखानदार, व्यावसायिक आणि शेतकरी वर्गाकडून प्रतिसाद मिळत आहे. विभागाला वाढत असलेला प्रतिसाद लक्षात घेता महामंडळाने आणखी १० मालवाहतूक एसटी मंजूर केल्या आहेत.

वर्धा विभागात १५०० कर्मचारी
वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट, तळेगाव (श्या.पंत) हे पाच आगार असून १५०० च्या जवळपास कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना काळात एसटीची सेवा बंद होती. वेतनावरही परिणाम झाला होता. यामुळे या कर्मचाऱ्यांचाही जीव टांगणीला लागला होता. एसटीचा गाडा आता पूर्वपदावर येत मालवाहतुकीमुळे हातभार लागला असल्याने कर्मचारी वर्गात काही प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.

वेतनावर २ कोटी २५ लाखांचा खर्च
वर्धा विभागांतर्गत असलेल्या पाचही आगारात १५०० च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक कार्यरत असून या सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महामंडळाकडून महिन्याकाठी २ कोटी २५ लाखांवर खर्च होतो.

एसटीचे कर्मचारी दोन महिन्यांपासून वेतनाविना; आर्थिक ओढाताण
कोरोना विषाण संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे एसटीची चाके जागीच थांबली होती. परिणामी, महामंडळाचे कोट्यवधींचे वाहतूक उत्पन्न बुडाले. पंधरवड्यापूर्वी एसटीची प्रवासी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली. मात्र, अद्याप प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असाच आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम झाला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची प्रचं आर्थिक ओढाताण होत आहे. वेतनाचा प्रश्नही आता सुरळीत करावा, अशी मागणी कर्मचारीवर्गातून होत आहे.

Web Title: Freight hits ST's revenue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.