यशोदा नदीपात्रातून चार ट्रक, एक जेसीबी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:14+5:30
सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला.

यशोदा नदीपात्रातून चार ट्रक, एक जेसीबी जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणारे चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार राजेश सरवदे यांनी मंगळवारी रात्री बारा वाजता केली. मध्यरात्री दोन वाजतापर्यंत ही कारवाई करीत पाचही वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली.
सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला. अखेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास आठ ते दहा ट्रक व जेसीबी वाळूघाटाकडे जात असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांना देण्यात आली. त्यांनी याबाबत तहसीदलार राजेश सरवदे यांना दिली. तहसीलदारांनी लागलीच वाहनचालकासह वाळू घाटावर धाड टाकली. वाळू घाटात जेसीबीच्या सहाय्याने ट्रक भरले जात होते. त्यामुळे तहसीलदारांनी शेखर लुंगे यांच्या मालकीचे एम.एच. ४० एन. ४८६४ व एम. एच. ३२ बी. ९९५३ क्रमांकाचे दोन, संतोष काशीनाथ नवरंगे यांच्या मालकीचा एमएच ३२ क्यू ६४६२ क्रमांकाचा एक तर विशाल देविदास चौधरी यांच्या मालकीचा एम.एच. ३६ एफ. ०५१७ क्रमाकांचा एक असे चार ट्रक आणि रोशन मिसाळ यांच्या मालकीचा जेसीबी जप्त करण्यात आला. हे सर्व वर्ध्यातील रहिवासी असून त्यांच्या वाहनांवर प्रत्येकी पावणे तीन लाखांप्रमाणे पावणे चौदा लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर ही सर्व वाहने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईकरिता पाठविणार असल्याचे तहसीलदार सरवदे यांनी सांगितले.
कारमधून ठेवला जात होता पहारा
मंगळवारी अंधार होताच वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपली वाहने सोनेगाव (बाई) येथील वाळू घाटाच्या रस्त्याने उभी केली होती. आठ ते दहा मोठे ट्रक व जेसीबीचा यात समावेश होता. तसेच या वाळूचे भरलेले ट्रक मार्गावर लावण्याकरिता तीन ते चार कारही या ट्रकच्या सोबत होत्या. आठ वाजतापासूनच उपसा सुरू केल्याने कारवाईपर्यंत अनेक वाहने भरुन मार्गाने लागली होती. त्यामुळे तहसीलदारांना चारच वाहने मिळून आली. यावेळी एक कारही तहसीलदारांना मिळून आली होती असे गावकरी सांगत आहे. पण; त्या कारचा या कारवाईचा कुठेही समावेश दिसत नाही. त्यामुळे या कारचालकावरही कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.