नागाने गिळली मांजरीची चार पिलं
By Admin | Updated: May 11, 2014 00:31 IST2014-05-11T00:31:57+5:302014-05-11T00:31:57+5:30
घरात शिरलेल्या नागाने पाहता पाहता मांजरीचे चक्क चार पिल्ले गिळंकृत केले. हे दृश्य अंगाचा थरकाप उडविणारे होते.

नागाने गिळली मांजरीची चार पिलं
सेवाग्राम : घरात शिरलेल्या नागाने पाहता पाहता मांजरीचे चक्क चार पिल्ले गिळंकृत केले. हे दृश्य अंगाचा थरकाप उडविणारे होते. घाबरलेल्या घरातील मंडळींनी लगेच सर्पमित्राला बोलावून सापाला पकडले. साप पकडून उलटे केले असता चारही पिल्ले सापाच्या तोंडातून पटापट बाहेर पडले, मात्र ते मृतावस्थेत होते. आदर्शनगरील दिलीप शेंदरे यांच्या घरी शुक्रवारी घडलेली ही घटना चर्चेला विषय ठरली आहे. शेंदरे यांच्या घरी एका मांजराने चार पिल्लांना जन्म दिला. याची घरच्यांना जाण होती. अशातच त्या पिल्लांजवळ नाग गेला. ही बाब लक्षात येईस्तोवर त्या सापाने मांजरीची चारही पिल्ले गिळंकृत केली होती. पिल्ले दिसत नाही म्हणून शहानिशा केली असता साप त्या पिल्लांना गिळंकृत करीत होता. ही वार्ता परिसरात पसरताच एकच गर्दी झाली. हा प्रकार सर्पमित्र गणेश चौधरी यांना सांगितला. त्यांनी लगेच साप पकडण्याच्या साहित्यासह धाव घेतली. त्यांनी अलगद सापाला पकडून बाहेर आणले व शेपटीकडून सापाला पकडले असता त्यांने गिळंकृत केलेली मांजरीची चारही पिल्ले सापाने बाहेर फेकली. मात्र ती पिल्ले मृतावस्थेत होती. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडल्याचे सांगण्यात आले. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)