डीपीडीसीच्या बैठकीत आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येणार
By Admin | Updated: January 29, 2015 23:11 IST2015-01-29T23:11:01+5:302015-01-29T23:11:01+5:30
जिल्ह्याचे नवे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा नियोजन समितीतील विकास कामांचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. योगायोग असा की यापूर्वीचे पालकमंत्री रणजित कांबळे हे सुद्धा या सभेला आमदार

डीपीडीसीच्या बैठकीत आजी-माजी पालकमंत्री आमने-सामने येणार
राजेश भोजेकर - वर्धा
जिल्ह्याचे नवे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हा नियोजन समितीतील विकास कामांचा शुक्रवारी आढावा घेणार आहेत. योगायोग असा की यापूर्वीचे पालकमंत्री रणजित कांबळे हे सुद्धा या सभेला आमदार व समितीचे सदस्य या नात्याने हजर राहतील. त्यांच्या समक्ष त्यांनी यापूर्वी मंजूर केलेल्या विकास कामांना बगल देण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, वर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक सेवाग्राम आश्रम लगतच्या यात्री निवासात होऊ घातली आहे. यामुळे या बैठकीला ऐतिहासिक पार्श्वभूमीही लाभणार आहे.
रणजित कांबळे यांनी पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अनेक विकास कामांना मंजुरी दिलेली आहे. वास्तविक, त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आली. त्यानंतर अल्पावधीतच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. यामुळे मंजूर विकास कामांना प्रत्यक्ष साकार करण्याचा अवधी जिल्हा प्रशासनाला मिळालाच नाही. यामुळे मंजुर झालेली अनेक कामे ही कागदावरच असल्याची माहिती आहे. यानंतर राज्यात भाजपचे सरकार सत्तारुढ झाले. नवा गडी नवा डाव, या उक्तीनुसार नवे पालकमंत्री आणि त्यातच भाजपचे नवे आमदार आपल्या मर्जीतील कामांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. यासाठी भाजप आमदारांकडून दबाब वाढत असल्याची माहिती आहे.
पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा ना. सुधीर मुनगंटीवार हे वर्धेत आले होते. तेव्हा त्यांनी जिल्ह्यातील विकास कामांचा धावता आढावा घेतला होता. यावेळीच जिल्हा प्रशासनाला काही नवीन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले होते.
यावरुन शुक्रवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत नवे विषय पटलावर येण्याची दाट शक्यता आहे. यातच जे जुने विषय अद्यापही कागदावरच आहे त्या विषयांना बगल दिली जाण्याचीही दाट शक्यता आहे. असे झाल्यास रणजित कांबळे हे स्वत: हजर राहणार असल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही जनतेचे लक्ष लागलेले आहे.