पूर व वादळाचा तडाखा
By Admin | Updated: July 23, 2014 23:46 IST2014-07-23T23:46:35+5:302014-07-23T23:46:35+5:30
वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा

पूर व वादळाचा तडाखा
यशोदा नदीच्या पुरामुळे वाहतूक ठप्प; घरांची पडझड, शेतीही खरडली
देवळी - वादळी पावसाचा तालुक्यातील सर्व गावांना फटका बसला़ यात मोठे नुकसान झाले़ बोरगाव-आलोडा, सरुळ-वायगाव तसेच देवळी ते डिगडोह, नांदोरा व मुरदगाव या पुलावरील वाहतूक यशोदा नदीच्या पुरामुळे बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ नदी व नाल्यांचे पाणी शेतात गेल्याने शेतांना तलावाचे स्वरुप आले़ पुरामुळे शेते खरडून गेली व पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन बियाणे जमिनीत सडले तर कपाशीचे पीक पूर्णत: पाण्याखाली आल्याने नुकसान झाले. झाडे पडून घरांची पडझड झाली. बुधवारी सकाळपर्यंत १३१ मिमी पावसाची नोंद झाली़
तीन तालुक्यांत दोन दिवस वीज गुल; अनेक मार्ग बंद
आष्टी (श़) - सततच्या पावसामुळे आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील वीज मंगळवार रात्रीपासून बंद होती़ यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते़ कारंजा येथील वीज पुरवठा पहाटे ४ वाजता तर आष्टीची वीज रात्री १ वाजेपासून बंद होती़ तळेगाव ते आष्टी मार्गावर झाडे पडल्याने रात्रीपासून बुधवारी दुपारपर्यंत वाहतूक ठप्प होती़ जाम नदीच्या पुरामुळे आष्टी ते साहूर मार्ग बंद होता़ जाम, बाकळी व कड नदीला पूर आल्याने परिसरातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ सर्वाधिक नुकसान साहूर परिसरात झाल्याची नोंद आहे़
मनसावळी ते कापसी मार्ग ठप्प
हिंगणघाट - संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले ठप्प झाली़ २४ तासांत तालुक्यात ११४़४० मि.मी. तर एकूण ४०१ मिमी पाऊस झाला़ पावसामुळे वर्धा, यशोदा, वणा, पोथरा, लाल नाला आदींसह नाले दुथड्या वाहत आहे़ यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे मनसावळी ते कापसी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती़ संततधार पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयातील उपस्थिती रोडावली व बाजारपेठाही ओस होत्या़
तालुक्यात ९३ गावांची पडझड
समुद्रपूर - तुडूंब भरलेल्या लाल नाला धरणाची ५ दारे खुले करण्यात आली़ पोथरा धरण ओव्हरफ्लो झाले़ बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुक्यात १२७ मिमी तर एकूण ३९१.३ मिमी पावसाची नोंद झाली़ वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी असल्याने वर्धा-समुद्रपूर मार्ग सकाळी ४ तास बंद होता. मार्डा येथे १० कुटुंबांना प्राथमिक शाळेत हलविण्याची तयारी होती; पण पाऊस थांबल्याने प्रक्रिया रोखली़ डोंगरगाव, आसोला व कोरा परिसरात काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला़ वाघाडी नदीचे पाणी शेतांत पाणी शिरल्यासने पिकांचे नुकसान झाले. चारमंडळ येथे ५० घरांचे अंशत: तर अंतरगाव, घोरपड, चापापूर, वानरचुआ, सावंगी, लोखंडी, वाघेडा, सायगव्हान, धोंडगाव, समुद्रपूर, वायगाव (ह.), रेणकापूर, निंभा, बोडखा, मुरादपूर, पाइकमारी आदी गावांतील एकूण ४३ घरांची अंशत: पडझड झाली़
कारंजा तालुक्यात १९३ घरांची पडझड
तालुक्यात १९३ घरांची अंशत: पडझड झाली़ यात कारंजा मंडळात ५६, सारवाडी ४९, ठाणेगाव ३३, कन्नमवारग्राम ४५ घरांची पडझड झाली़ यात ५ लाखांचे नुकसान झाले़ तहसीलदार बालपांडे यांनी बिहाडी, वाघेडा, काकडा, सेलगाव (ल़) गावांना भेटी देत आढावा घेतला़ ६८ गावांतील शेतांना फटका बसला़ बांध फुटल्याने शेती खरडली़ मंगळवारी सायंकाळी १७ टक्के असलेला खैरी धरणाचा जलसाठा बुधवारी दुपारी ९० टक्क्यांवर पोहोचला़