यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:00 AM2019-11-09T06:00:00+5:302019-11-09T06:00:21+5:30

देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दोन नदींचा संगम असून ही नदी सिरसगाव (धनाड्य), सोनेगाव(बाई) व टाकळी (चनाजी) या तीन्ही गावातून वाहते. यावर्षी नदीला पूर गेल्याने वाळूसाठाही चांगला झाला आहे. याचाच फायदा उचलून मागील एक महिन्यांपासून वर्धा, देवळी, वायगाव (निपाणी), सालोड (हिरपूर) व सावंगी (मेघे) येथील वाळू चोरट्यांनी अवैध वाळू उपसा सुरु केला आहे.

A flock of sand thieves in the river Yashoda | यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड

यशोदा नदीत वाळू चोरट्यांची झुंबड

Next
ठळक मुद्देवर्धा, देवळी, वायगाव, सालोड व सावंगीच्या माफियांचा हैदोस

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वाळूघाटातूनवाळू उपस्याची मुदत संपल्याने वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा आता गावखेड्यातील नदी-नाल्यांकडे वळविला आहे. याचा प्रत्यय देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीपात्रात पहावयास मिळत आहे. या नदीपात्रात अंधार होताच वर्धा, देवळी, वायगाव (निपाणी), सालोड (हिरपूर) व सावंगी (मेघे) येथील वाळू चोरट्यांची झुंबड पहावयास मिळते. गेल्या महिन्याभरापासून हा प्रकार राजरोसपणे सुरु असून चोरट्यांनी नदीपात्रातून शेतशिवारात जाणारा रस्ताही पोखरुन टाकला आहे.
देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दोन नदींचा संगम असून ही नदी सिरसगाव (धनाड्य), सोनेगाव(बाई) व टाकळी (चनाजी) या तीन्ही गावातून वाहते. यावर्षी नदीला पूर गेल्याने वाळूसाठाही चांगला झाला आहे. याचाच फायदा उचलून मागील एक महिन्यांपासून वर्धा, देवळी, वायगाव (निपाणी), सालोड (हिरपूर) व सावंगी (मेघे) येथील वाळू चोरट्यांनी अवैध वाळू उपसा सुरु केला आहे.वायगाव (निपाणी) आणि देवळीतील वाळू चोरटे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सकाळपासूनच वाळू चोरी करीत आहे. तसेच रात्र होताच वर्धा, सालोड (हिरपूर) व सावंगी (मेघे) येथील मोठी वाहने नदीपात्रात अवैध उपसा करतात. यात वर्धा आणि सालोड (हिरपूर) येथील दोघांनी चांगलाच धुडगूस घातला आहे.
वाळू घाटाचा लिलाव घेतल्याप्रमाणेच हे दोघेही नदी पोखरत आहे. सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीपात्रात जाण्याकरिता गावाबाहेरुनच रस्ता असल्याने रात्री कोणीही या मार्गाने फिरकत नाही. याचा फायदा घेत रात्री ९ वाजतापासून वाहनांची रांग लागते.
या वाळू चोरट्यांनी नदीपात्रातून शेतात जाण्याकरिता असलेला रस्त्याही पोखरल्याने शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. सोबत नदीपात्रापर्यंत जाणारा रस्ताही जडवाहतुकीने खराब झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो. याकडे तालुका प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

कारवाईनंतरही वाळूघाटातून दिवसरात्र अवैध उपसा सुरूच
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीपात्रात मागील वर्षापासून या वाळूचोरट्यांचा उच्छाद चांगलाच वाढला आहे. याही वर्षी महिन्याभरापासून वाळूचोरी सुरु केल्याने नदीपात्र धोक्यात आले. याची माहिती तहसील कार्यालयाला देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. मात्र जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यानी तहसीलदारांना कळविताच तहसीलदार सरवदे यांनी घाटावर धाड टाकून एक जेसीबी आणि चार ट्रक जप्त केले. ही कारवाई रात्री साडेबारा ते दोन वाजतापर्यंत चालली. पण, कारवाई होण्यापूर्वी व कारवाई झाल्यावरही येथू वाळू उपसा सुरुच होता. विशेषत: आताही दररोज रात्री उपसा कायमच असल्याने कारवाईचा धाक नसल्याचेच दिसून येत आहे. जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी कळविल्यावर तत्काळ कारवाई होते पण; तालुक्यातील अधिकाऱ्यांना ही वाळूचोरी दिसत नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल.

त्यांच्याकडून महसुलाची वसुली करा
तहसीलदारांनी तीन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत लुंगे, नवरंगे,चौधरी व मिसाळ यांच्या मालकीचे चार ट्रक व एक जेसीबी जप्त केला. तसेच वाळू चोरट्यांना १४ लाख ७५ हजार रुपयाचा दंडही ठोठवला. पण, त्यांचे सहकारी हातून निसटल्याने प्रशासने या चौघांडकूनच बाकी वाळू चोरट्यांची माहिती घ्यावी. तसेच या सर्वांकडून आतापर्यंत उत्खनन केलेल्या वाळूचा महसूल प्रशासनाने वसुल करावा, अशी मागणीही गावकऱ्यांकडून होत आहे. आता प्रशासन वाळू चोरट्यांसोबतचे सबंध जोपासणार की शासनाचा महसूल बुडाल्याने शासकीय कर्तव्य बजावणार, याकडे लक्ष लागले आहे.

गावकºयांच्या जीवालाही धोका
नदीपात्रात आलेल्या वाहनांसोबतच त्यांच्या मालकाच्या व कर्मचाऱ्यांच्या कारही मागेच असतात. गावकरी, अधिकारी व पोलीस यांच्यावर पाळत ठेऊन ते वाळू भरलेल्या वाहनांना बॅकअप देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एकटादुकटा व्यक्ती त्यांच्या वाहनाला थांबवू शकत नाही. विशेषत: वर्धा आणि सालोड येथील वाळूचोरटे सोबत शस्त्र बाळगत असल्याचाही आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नुकताच काही वाळूचोरट्यांनी सिरसगाव (धनाड्य) येथे गावकऱ्यांवर शस्त्र उगारुन वाद घातल्याचे सांगण्यात आले. हाच प्रकार टाकळी (चनाजी) येथेही घडला. त्यामुळे या वाळू चोरट्यांपासून गावकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. नुकताच केलेल्या कारवाईत नवरंगे नामक वाळू चोरट्याचाही ट्रक जप्त करण्यात आला आहे. या व्यक्तीने समुद्रपूर तालुक्यातील शिवणी घाटात उपविभागीय अधिकाºयांच्या पथकावर पिस्टल रोखली होती. आता गावकडेही त्याने मोर्चा वळविल्याने याही ठिकाणी या चारेट्यांकडून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Web Title: A flock of sand thieves in the river Yashoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.