आरोग्य सुविधेसाठी राज्याला पाच पुरस्कार
By Admin | Updated: August 23, 2014 02:01 IST2014-08-23T02:01:38+5:302014-08-23T02:01:38+5:30
जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासोबतच बालमृत्यू, सिकलसेल, सुरक्षित मातृत्व तसेच रक्त अभिसरणासारख्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात

आरोग्य सुविधेसाठी राज्याला पाच पुरस्कार
वर्धा : जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासोबतच बालमृत्यू, सिकलसेल, सुरक्षित मातृत्व तसेच रक्त अभिसरणासारख्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. हा लौकीक यापुढेही कायम ठेवण्याकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी केले.
वर्धा येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्राची स्थापना आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी झाली. जिल्ह्यामध्ये १९१५ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना झाली. या रुग्णालयात २८६ खाटा उपलब्ध आहेत. स्त्री रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शासनाने १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या निर्मितीकरिता व उभारणीसाठी १४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. तसेच येथे नवजात अर्भक केंद्राची स्थापनाही करण्यात येणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तीन हजार ५५१ प्रसूती, ७५२ सिझेरीयन शस्त्रक्रिया, सात हजार सोनोग्राफी तसेच ६८८ स्त्री कुटुंब शस्त्रक्रिया मागीलवर्षी करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालयासोबतच स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्राची सुरुवात होत असल्यामुळे स्त्रियांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ना. सुरेश शेट्टी यांनी स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाचा शुभारंभ केला व त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री रणजीत कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुरेश देशमुख, जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, जि.प. उपाध्यक्ष संजय कामनापुरे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सभापती दिनेश धांदे, छोटू जगताप, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)