आधी लाॅकडाऊन;आता बसडाऊनने केले विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वांधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 05:00 IST2021-12-10T05:00:00+5:302021-12-10T05:00:21+5:30
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या गावात किंवा शहरामध्ये शिक्षणाकरिता एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शाळेमध्ये जाण्याकरिता आसुसले होते. त्यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला होता; पण अचानक २८ ऑक्टोबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून जिल्ह्यातील पाचही आगारांतून लालपरी बाहेर पडलीच नाही.

आधी लाॅकडाऊन;आता बसडाऊनने केले विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे वांधे
आनंद इंगोले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आधी लॉकडाऊनमुळे तर आता एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी साधारणत: दीड महिन्यापासून संप पुकारल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाची सवलत पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बस नसल्याने खासगी वाहनांचा प्रवास करणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये सुरू झाली असतानाही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अत्यल्प असल्याने शैक्षणिक भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या गावात किंवा शहरामध्ये शिक्षणाकरिता एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शाळेमध्ये जाण्याकरिता आसुसले होते. त्यामुळे शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला होता; पण अचानक २८ ऑक्टोबरपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून जिल्ह्यातील पाचही आगारांतून लालपरी बाहेर पडलीच नाही. दिवाळीच्या सुट्या संपून शाळा, महाविद्यालये सुरू झाली; परंतु लालपरी आगारातच उभी असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बऱ्याच गावांमध्ये वाहतुकीचे कोणतेही साधन नसल्याने विद्यार्थी शाळा, महाविद्यालयांपासून दूरच आहे. ऑफलाइन शिक्षण सुरू झाल्याने शाळा, महाविद्यालयाकडून ऑनलाइन शिक्षण बंद करण्यात आले आहे. सोबतच सध्या कनिष्ठ महाविद्यालयात सत्रांत परीक्षा सुरू असून येत्या काही दिवसांत वरिष्ठ महाविद्यालयाच्या सत्र परीक्षा सुरू होणार आहे.
त्यामुळे या महत्त्वांच्या दिवसातही विद्यार्थ्यांना बसअभावी शाळा, महाविद्यालयात येता येत नाही. लॉकडाऊनच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात २४ हजार ९९७ शैक्षणिक सवलत पासधारक होते. आता या सर्व पासधारकांची बसअभावी आर्थिक कोंडी झाली आहे. दररोज खासगी वाहनाने ये-जा करणे शक्य नसल्याने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर लोटला जात आहे.
शाळेत जायचेय धोका पत्करा!
- एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवासाकरिता पालकांकडून एसटी बसला पसंती दिली जाते. राज्य परिवहन महामंडळाकडूनही सवलतीमध्ये शैक्षणिक पास उपलबल्ध करून दिली जाते; पण आता बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. खासगी प्रवास हा असुरक्षित असून खिशावर भार वाढविणारा आहे; परंतु शाळा, महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना नाइलाजास्तवर खासगी वाहनातून प्रवास करावा लागत असल्याने शाळा, महाविद्यालयांत जायचे असल्यास धोका पत्करावा लागत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयात गेलेला पाल्य घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात.
सवलत पासधारक तसे यावर्षी कमीच
- लॉकडाऊन काळापूर्वी जिल्ह्यामध्ये जवळपास २४ हजार ९९७ शैक्षणिक पासधारक असायचे. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशित, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेंतर्गत आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असतो; पण लॉकडाऊनंतर पावणे दोन वर्ष शाळा, महाविद्यालये बंद असल्याने यंदा फारशा विद्यार्थ्यांनी पासच काढली नाही. तसेच सर्व कर्मचारी संपावर असल्याने यावर्षी किती शैक्षणिक पासधारक आहेत, याची माहिती उपलब्ध नसल्याने आगाराकडून सांगण्यात आले.
ग्रामीण भागात असलेल्या आमच्या शाळेत पाचवी ते आठवीपर्यंतचे ४६ विद्यार्थी महामंडळाच्या बसने येतात. गेल्या दीड महिन्यापासून बस बंद असल्याने त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दररोजच्या जाण्या-येण्याकरिता ऑटोची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याकरिता दररोज ३५० रुपये खर्च येत आहे. सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांतील शिक्षकांनीही पदरमोड करून अशी विद्यार्थ्यांची व्यवस्था केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य पाऊल उचलावे.
-विजय कोंबे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती