Coronavirus in Wardha कोरोनाग्रस्त शेतकरी रुग्णांसाठी राज्यातील पहिले केअर सेंटर वर्धा जिल्ह्यात होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 16:22 IST2021-04-26T16:21:25+5:302021-04-26T16:22:59+5:30
Wardha news ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ने आर्वी येथे ३८ खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात आर्वी उपविभागातील सर्व तालुक्यांतील रुग्ण व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

Coronavirus in Wardha कोरोनाग्रस्त शेतकरी रुग्णांसाठी राज्यातील पहिले केअर सेंटर वर्धा जिल्ह्यात होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त आढळून येत आहेत. या रुग्णांना शहरात व तालुका मुख्यालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नाही, ही बाब लक्षात घेऊन ‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’ने आर्वी येथे ३८ खाटांचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रात आर्वी उपविभागातील सर्व तालुक्यांतील रुग्ण व अमरावती जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबांतील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.
‘एकच मिशन शेतकरी आरक्षण’चे प्रणेते शैलेश अग्रवाल यांचे आर्वी येथे सुसज्ज रुग्णालय आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून ते रुग्णालय बंद करण्यात आले होते. गतवेळी कोरोनाची लाट आल्यानंतर अग्रवाल यांनी जिल्हा प्रशासनाकडे सदर रुग्णालय केअर सेंटर म्हणून नि:शुल्क देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भात त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्याशी पत्रव्यवहार केला होता व राज्य सरकारलाही तशी विनंती केली होती. मात्र, सदर रुग्णालय सेंटर त्यावेळी सेवेत घेण्यात आले नव्हते. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याने गावांची परिस्थिती बिकट होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन पुन्हा अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार व आरोग्य यंत्रणेकडे हे रुग्णालय केअर सेंटर म्हणून देण्याची तयारी दर्शविली. मात्र, प्रशासनाकडून फारसा प्रतिसाद न मिळाल्याने अग्रवाल यांनी आता सदर रुग्णालयात ३८ खाटांचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात दहा ऑक्सिजनयुक्त खाटा असून, उर्वरित खाटा विलगीकरणासाठी वापरल्या जाणार आहेत. लवकरच हे रुग्णालय सुरू केले जाणार असून, आर्वी, कारंजा, आष्टी व अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील रुग्णांना येथे उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आपण काम करीत असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले.
कोरोनाची दुसरी लाट पसरल्यानंतर विविध ठिकाणाहून ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व उपचारासाठी किमान बेड उपलब्ध करून द्या म्हणून शेकडो फोन येऊ लागले. प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नव्हते. अनेकांना बेड उपलब्ध करून देण्यात आले. सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधेची गरज लक्षात घेऊन कोविड केअर सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला. यासाठी वैद्यकीय अधिकारी व पॅरामेडिकल स्टाफ तयार असून, लवकरच हे रुग्णालय जनतेच्या सेवेत सुरू केले जाणार आहे.
- शैलेश अग्रवाल, प्रणेते, एकच मिशन शेतकरी आरक्षण