जळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST2022-01-08T05:00:00+5:302022-01-08T05:00:13+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मोठी हिम्मत करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिजे तसे यश येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. या आगीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे.

जळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यातील जळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अचानक लागलेल्या आगीत विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने आरोग्य विभागाचे तब्बल २ लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली असून, बॅटरीच्या वायरने अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच एकच खळबळ उडाली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मोठी हिम्मत करून आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पाहिजे तसे यश येत नसल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना पाचारण करण्यात आले.
माहिती मिळताच आर्वी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध साहित्य जळून कोळसा झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र प्रशासनाचे सुमारे २ लाखांचे नुकसान झाले आहे.
तांत्रिक बिघाड ठरला घटनेसाठी कारणीभूत
- जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सौरऊर्जेचे पॅनल आहे. याच सौरऊर्जेच्या पॅनलच्या बॅटरीमध्ये काही तांत्रिक बिघाड हाेत अचानक वायरने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील टीव्ही, इन्व्हर्टर, सेटअप बॉक्स, बॅटरी जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.
दस्ताऐवज सुरक्षित
- अचानक लागलेल्या आगीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध साहित्य जळू खाक झाले असले तरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोणतेही महत्त्वाची कागदपत्रे जळाली नसल्याचे आणि ते पूर्णपणे सुरक्षित असल्याचे जळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. पवन पाचोडे आणि डॉ. मिलिंद वर्मा यांनी सांगितले.