गावात पाचशेऐवजी आता पन्नासच बैलजोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:39+5:30
वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला.

गावात पाचशेऐवजी आता पन्नासच बैलजोड्या
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठोडा (खोंडे) या गावी ४ हजार लोकांची वस्ती होती. या गावामध्ये ५०० बैलजोड्या असल्याने त्यांचा मोठा पोळा भरायचा. हा पोळा तालुक्यामध्ये प्रसिद्ध होता. बैलजोड्यांची आकर्षक सजावट करणाऱ्यांवर बक्षिसांची लयलूट व्हायची.पण, हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे पुनर्वसन झाल्याने विभाजन करण्यात आले. परिणामी पोळ्याची मजाही गेली आणि पाचशे बैलजोड्यांच्या गावात आता यांत्रिकीकरणामुळे ५० बैलजोड्याच शिल्लक राहिल्या आहेत.
वाठोडा गावात सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोसावी समाजाची वस्ती होती. गोसावी समाजबांधवानी बांधलेली प्राचीन मंदिरे आजही इथे पहावयास मिळतात. हे गांव चोहनदीच्या काठावर वसलेल होते. गावाच्या मागील बाजूस बाकळी नदी वाहत होती. प्रारंभी खोंडे परीवार मराठवाड्यातून या गावी वास्तव्यास आला. कालांतराने विविध जातीधर्मांचे लोकही या गावात वास्तव्यास आले. खोंडे परिवाराकडे या गावाची पाटीलकी असल्यामुळे या गावाला वाठोडा (खोंडे ) असे नामानिधान झाले. आजुबाजुचा प्रसन्न परिसर, सुपीक जमीन, आमराई तसेच या गावातील वाड्यांवरुन गावाची संपन्नता लक्षात यायची. ब्रिटिशांच्या काळात या गावाची मालगुजारी खोंडे परीवाराकडे होती. कालांतराने ही मालगुजारी डागा परिवाराकडे आली.
चोहनदीच्या पात्रातील हनुमंताचे भव्य मंदिर तत्कालीन मालगुजार किसनदास डागा यांनी बांधले आहे. आजही हे मंदिर निम्न वर्धा धरणाच्या पाण्यात मजबूत स्थितीत डौलाने उभे आहे. एकोप्याने नांदणारे हे गाव निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने या गावाचे हैबतपूर, अंबिकापूर व भाईपूर या तीन ठिकाणी पूनर्वसन झाले आहे.
त्यामुळे पोळ्यासह इतरही सामूहिक कार्यक्रमांचा आनंद हिरावला आहे.तसेच यांत्रिकिरणालाही चालना मिळाल्याने आता सण, उत्सवावरही त्याचा परिणाम झाला आहे.
वाठोड्यातून मिळाले तीन
आर्वी तालुक्याच्या इतिहासात वाठोडा (खोंडे) या गावाला अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. या गावाने शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रामध्ये आपली वेगळीच छाप सोडली आहे. या गावाने तीन आमदार दिले असून त्यामध्ये स्व.नारायणराव काळे, स्व.शरदराव काळे व माजी आमदार अमर काळे यांचा समावेश आहे. या गावातील अनेक व्यक्ती मोठ्या पदावर कार्यरत आहे. या गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भेट दिली आहे.
महाप्रसादातही खंड
येथील वाळवंटातल्या महाप्रसादाचं सर्वांना महत्त्व होतं. अख्खं गाव या महाप्रसादाला उपस्थित रहायचं. भाकर, कन्या व डाळभाजीच्या जेवणाची मजा काही औरच होती. येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरायचा. तेथेच खेळाचे मैदान होते. क्रिकेट,व्हॉलीबॉल, विटी दांडू, सुरकांडी, आपडाफ, कंचे, कबड्डी, खुप्पस असे नानाविध खेळ खेळले जात. दरवर्षी आषाढीपासून सणांना सुरुवात व्हायची. या सणांना गावातील सर्व मंडळी गुण्यागोविंदाने साजरे करायचे.