चिमुकल्यांचे आरोग्य घाणीच्या स्वाधीन
By Admin | Updated: November 29, 2014 23:24 IST2014-11-29T23:24:09+5:302014-11-29T23:24:09+5:30
अंगणवाड्यांच्या माध्यमातून शासन कूपोषण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शिवाय बालकांच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणूनही अंगणवाड्यांकडे पाहिले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे याकडेच दुर्लक्ष

चिमुकल्यांचे आरोग्य घाणीच्या स्वाधीन
अंगणवाड्या आजारांचे केंद्र : कचरा, सांडपाण्याचे सानिध्य
वर्धा : अंगणवाड्यांच्या माध्यमातून शासन कूपोषण दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे़ शिवाय बालकांच्या शिक्षणाची पहिली पायरी म्हणूनही अंगणवाड्यांकडे पाहिले जाते; पण स्थानिक स्वराज्य संस्थांचे याकडेच दुर्लक्ष होत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले़ यावरून चिमुकल्यांचे आरोग्य घाणीच्या स्वाधीन केल्याचे चित्र पिपरी (मेघे) ग्रा़पं़ अंतर्गत असलेल्या सर्व अंगणवाड्यांमध्ये दिसून आले़ जि़प़ पदाधिकाऱ्यांनीही या अंगणवाड्यांना भेट देत पाहणी केली़
पिपरी (मेघे) ग्रा़पं़ अंतर्गत विविध भागातील अंगणवाड्यांना जि़प़ अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर रोजी भेट दिली़ यात विदारक वास्तव समोर आले़ शनिवारी (दि़२९) रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता जवळपास सर्वच अंगणवाड्यांमध्ये बालकांचे आरोग्य घाणीच्या स्वाधीन केल्याचे दिसते़ जि़प़ अध्यक्षांनी १५/८, ८६/८५, १२/३५, ३४ आणि ३० या क्रमांकांसह आठ अंगणवाड्यांची पाहणी केली़ यात बहुतेक अंगणवाडी परिसरात घाण, सांडपाण्याचे डबके साचलेले दिसून आले़ यातील काही अंगणवाड्यांत शौचालयाच्या टाक्या उघड्या आहेत़ यावर सिमेंटचे आच्छादन करण्यात आलेले नसल्याचे दिसून आले़ बालकांचे आरोग्य सांभाळत त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या अंगणवाड्यांची अशी दयनिय स्थिती असल्याने बालकांचे पोषण योग्यरित्या कसे होत असेल, हा प्रश्न पडतो़ काही अंगणवाड्यांसमोर सांडपाण्याचे डबके, वाढलेले गवत, केरकचरा तर काही ठिकाणी बांधकाम साहित्याने घेरलेल्या अंगणवाड्या दिसून आल्या़ एका अंगणवाडीला तर कुंपण भिंत असून सांडपाण्याच्या नाल्याही आहेत़
पिपरी (मेघे) ग्रा़पं़ अंतर्गत असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या सेविकांनी संबंधित पर्यवेक्षिका व त्यांनी जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शौचालय टाक्यांबाबत तसेच घाणीबाबत पत्रही दिले़ यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रा़पं़ प्रशासनाने १० टक्के निधीतून सदर कामे पूर्ण करावीत, अशा सूचनाही केल्यात; पण अद्यापही ती कामे करण्यात आलेली नाहीत़ पिपरी मेघे ग्रामपंचायतीने बालकांचे आरोग्य ही बाब गंभीरतेने घेतली नसल्याचेच यावरून दिसते़ एका सभागृहालगतच्या अंगणवाडीजवळ घोडा बांधला जातो़ शिवाय मोकाट गुरे बसलेली असतात व बांधकामाचे साहित्य टाकण्यात आल्याचे दिसून आले़ यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ चिमुकल्यांच्या या समस्या जि़प़ प्रशासनानेच पुढाकार घेत सोडविणे व ग्रा़पं़ प्रशासनाला तंबी देणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)