मुलाच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार
By Admin | Updated: August 10, 2014 23:10 IST2014-08-10T23:10:00+5:302014-08-10T23:10:00+5:30
माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसून सासरच्याच मंडळीने त्याचा घातपात केला असल्याचा आरोप सोरटा येथील अमृत कोल्हे यांनी लेखी निवेदनाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यात केला आहे.

मुलाच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार
वडिलांचा आरोप : कारवाईची मागणी
विरूळ (आकाजी) : माझ्या मुलाचा मृत्यू झाला नसून सासरच्याच मंडळीने त्याचा घातपात केला असल्याचा आरोप सोरटा येथील अमृत कोल्हे यांनी लेखी निवेदनाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यात केला आहे. या निवेदनातून त्याच्या सासरच्या मंडळीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोरटा येथील नंदकिशोर अमृतराव कोल्हे (३०) या युवकाचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते़ लग्नानंतर एक महिना त्यांचा संसार सुरळीत चालला. काही दिवसांनी मात्र पती पत्नीत कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण व्हायचे. गुरूपौर्णिमेला त्याची पत्नी माहेरी इसापूर येथे गेली. अशात २२ जुलै २०१४ रोजी तो पत्नीला आणण्यासाठी इसापूर गेला तो परत आलाच नाही़ अशात २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सेवाग्राम पोलीस ठाण्यातून नंदकिशोरचे मामा राजेंद्र बांगडकर यांच्या भ्रमणध्वनीवर फोन आला. यात एका तरुणाचे प्रेत पवनार येथील धाम नदीत सापडले आहे. मृतकाच्या हातावर एन व गौरी असे नाव गोंदलेले आहे़ यानंतर मृतकाचे कुटुंब सेवाग्राम पोलीस ठाण्यात गेले असता त्याची ओळख पटली. तो मृतदेह नंदकिशोरचाच निघाला.
नंदकिशोरचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास सेवाग्राम पोलीस करीत असले तरी त्याची हत्याच करण्यात आली असा आरोप मृतकाचे वडील अमृतराव कोल्हे यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात लेखी निवदेनाद्वारे केला आहे़ याला सासरची मंडळी जबाबदार असल्याचा आरोपही त्यांचा आहे. (वार्ताहर)