जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST2020-02-05T06:00:00+5:302020-02-05T06:00:19+5:30
हिंगणघाट शहरात सोमवारी सकाळी घडलेल्या अमानवीय घटनेतील आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पोलीस बॉईज महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा श्रीरंग मारबते उपस्थित होत्या.

जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट/वर्धा : हिंगणघाट शहरातील नंदोरी चौकात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटले. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, महिला संघटना यांनी निवेदनातून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. हिंगणघाट शहरात निघालेल्या मोर्चात सहभागी झालेल्या संघटनांनी ठाणेदार सत्यवीर बंडीवार, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना निवेदन सोपविले. तर वर्धा येथेही जिल्हाधिकारी कार्यालयात शेकडो देण्यात आली.
आरोपीला जामीन देऊ नका - पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी
वर्धा : हिंगणघाट शहरात सोमवारी सकाळी घडलेल्या अमानवीय घटनेतील आरोपीला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलीस बॉईज असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पोलीस बॉईज महिला आघाडीच्या अध्यक्ष वर्षा श्रीरंग मारबते उपस्थित होत्या. हिंगणघाट शहरात एका प्राध्यापिकेस पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना निंदनीय असून माणुकसीला काळीमा फासणारी आहे. अशा क्रूर प्रकरणांमधील आरोपीच्या कुटुंबाच्या सर्व सोयी-सवलती बंद करण्यात याव्या, असा कायदा महाराष्ट्रात लागू करण्यात यावा. जेणेकरून, कुणीही असा प्रकार करण्यासाठी शंभरवेळा विचार करेल. तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रिया ढोणे, वंदना नगराळे, मीनाक्षी बावणे, सविता उईके, कल्पना कुरसंगे, मेघा देशमुख, अर्चना मसराम, संगीता बेले, शीतल झाडे, कल्पना मंडारी, शालिनी मून, रंजिता भातकुलकर, वैशाली पाटील, सूरज बेले यांच्यासह असोसिएशनच्या इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वर्धा : हिंगणघाट शहरात प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देऊन पीडित युवतीला न्याय देण्यासाठी प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना वानखेडे, जि. प. महिला बालकल्याण सभापती सरस्वती मडावी, नगरसेविका श्रेया देशमुख, भाजपचे नेते अविनाश देव, मिलिंद भेंडे, जि.प. सभापती मृणाल माटे, माधव चंदनखेडे, वंदना भुते, जयश्री गफाट, ज्योत्स्ना सरोदे, नीता गजाम, पं.स. सभापती महेश आगे यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनात भाजपने म्हटले आहे की, अलीकडे घडलेल्या घटना पाहता मानसिक विकृतीच्या गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनासी झाली आहे. क्लिष्ट न्यायालयीन प्रक्रियेमुळे पीडितांना न्याय मिळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढत आहे. शिवाय माणुसकीला काळीमा फासणाºया घटना घडत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालून आरोपीला कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी करण्यात आली.
महिला काँग्रेसचे एसडीओंना निवेदन
हिंगणघाट : येथील जळीत प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय महसूल अधिकारी चंद्रभान खंडाईत यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना मंगला ठक, आशा कापटे, नलिनी महाजन, सुमन खाटे, कमल पाथर, इंदिरा पर्बत, सुमन धाबर्डे, गीता कोटकर, शेषराव लोणकर, गुड्डू शर्मा, तुकाराम कोल्हे, विद्या गिरी, दामिनी गिरी आदींची उपस्थिती होती.
आरोपीला कठोर शिक्षा द्या- शिक्षक परिषद
वर्धा : हिंगणघाट येथील घटनेमुळे महिला शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रा. अजय भोयर, एम. बी. इंगोले, पुंडलिक नागतोडे, संदीप चांभारे, परमेश्वर केंद्रे, रहीम शाह, अनिल टोपले, जयश्री पाटील, एस. जी. देशमुख आदींची उपस्थिती होती.