भारनियमनामुळे शेतकरी वैतागले
By Admin | Updated: August 18, 2014 23:39 IST2014-08-18T23:39:03+5:302014-08-18T23:39:03+5:30
पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा

भारनियमनामुळे शेतकरी वैतागले
ग्रामसभेत ठराव : वीज वितरणवर हल्लाबोल
पवनार : पावसाच्या दडीने शेतातील पीक मरनासन्न अवस्थेत आले आहे. अशात ओलिताची सोय असणाऱ्यांनी ओलीत करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाही इमरजन्सीच्या नावाखाली होत असलेल्या भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. यामुळे वैतागलेल्या गावाकऱ्यांनी मंगळवारी येथील वीज वितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा ठराव स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत घेतला.
वरूणराजाची अवकृपा झाल्यामुळे पीक वाचविण्यासाठी ज्यांच्याकडे पाणी देण्याचे स्त्रोत आहेत त्यांची धडपड सुरू आहे; परंतु भारनियमनामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पाणी फेरल्या जात आहे. पवनार भागात फक्त आठ तास शेतीला वीज दिल्या जाते. यात तीन दिवस सकाळी १० ते ६ व चार दिवस रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत भारनियमन होते. त्यातही अनियमितता आहेच. यातही इमरजन्सी भरनियमन असा शब्दप्रयोग वापरला जातो. शेतीशास्त्रानुसार शेतीची कामे ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत केली जातात; परंतु रात्री १२ वाजता जर कृषिपंपाना वीज पुरवठा केला जात असेल तर शेतकऱ्याने काय शेतातच वीजेची प्रतीक्षा करीत बसावे काय असा सवाल करण्यात आला आहे. थोडा पाऊस झाल्यामुळे बंधाऱ्यावर गवत वाढले आहे. त्यातून शेतकऱ्याला वाट काढीत शेतात जाऊन पाणी द्याव लागत आहे. शिवाय रानडुक्कर, रोही यासह सरपटणाऱ्या वन्यप्राण्यांची सुद्धा भीती आहे. यामुळे जीवित हानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कंपनीच्या स्थानिक कार्यालयात निवेदने देऊनही त्याचा उपयोग झाला नाही. यामुळे गावातील कृषी पंप धारकांनी १५ आॅगस्टला झालेल्या आमसभेत ठराव घेवून १९ आॅगस्ट मंगळवारला वीज वितरण कार्यालय पवनार येथे धरणे देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत १२ तास वीज देण्याची मागणी करण्यात येणार आहे.(वार्ताहर)