भागवत सप्ताहात शेतकरीकन्येचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 06:00 IST2020-01-30T06:00:00+5:302020-01-30T06:00:20+5:30
वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.

भागवत सप्ताहात शेतकरीकन्येचा विवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्याच्या धोत्रा येथील शेतकरी कुटुंबातील विवाह सोहळा ठरला. मात्र, दोन वर्षांपासून कर्जाच्या बोझ्यामुळे मुलीचा विवाह कसा करावा, हा प्रश्न पित्यापुढे होता. वर्ध्याच्या धोत्रा (रेल्वे) येथील परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांतीधाम येथे भागवत सप्ताहानिमित्त आयोजित रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात राऊत आणि भोयर कुटुंबातील विवाह सोहळा पार पडला. कृष्णगिरी परिवाराच्या एका निर्णयाने कर्जबाजारी होणारे दोन्ही शेतकरी कुटुंबीय आनंदाने गहिवरले.
लग्न सोहळा म्हटले की, आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण आनंदात साजरा करण्यासाठी मुलीचे वडील अक्षरश: आयुष्यभर झिजतात, कर्जबाजारी होतात. वर्ध्याच्या धोत्रा येथील संतोष राऊत यांच्यावर अशीच वेळ आली होती. दोन वर्षांपूर्वी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज थकीत आहे. नापिकी, अशातच मुलीसाठी आलेला निरोप या विवंचनेत असताना काय करावे, हे वडिलांना सुचेनासे झाले होते. कृष्णगिरी धाममध्ये पोहोचले आणि प्रश्नाचे उत्तर सापडले. धोत्रा येथे सद्गुरू परमहंस कृष्णगिरी महाराज विश्वशांती धाम आहे. येथे विमल गुल्हाणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याच सोहळ्यात मुलीचे लग्न होईल का, असा प्रस्ताव मुलीच्या वडिलांनी मांडला. यावर ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव गुल्हाणे यांनी तत्काळ होकार दर्शविला. सर्व खर्च स्वीकारत केवळ मुलगा आणि मुलगी घेऊन या, असे सांगण्यात आले. लग्नाची तयारी सुरू झाली.
नवरी सजली आणि भागवत सप्ताहाच्या मंडपात पोहोचली. संतोष राऊत यांची मुलगी संगीता आणि अमरावती जिल्ह्यातील एकलासपूर येथील विनायक भोयर यांचा मुलगा रवी हासुद्धा रुख्मिणी स्वयंवरात पोहोचला. रवी ‘कृष्ण’ आणि संगीता ‘रुक्मिणी’ अशापद्धतीने भागवत ऐकायला आलेली मंडळी वºहाडी झाले. याच सर्वांच्या साक्षीने दोघे विवाह बंधनात अडकलेत.
...तर उद्याचे चित्र नक्कीच बदलेल!
सर्वत्र वर्षभर धार्मिक कार्यक्रम होतात. भागवत सप्ताहानिमित्ताने भगवंताने सांगितलेला मार्ग कथेतून सप्ताहात सांगितला जातो. पण, अशा पद्धतीने लग्न सोहळा पार पाडत कृष्णगिरी धामने समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतरांनीही यापासून प्रेरणा घेतल्यास कोणत्याच मुलीचा बाप कर्जबाजारी होत मृत्यूला कवटाळणार नाही. हा संदेश सर्वत्र पोहोचला तर उद्याचे चित्र नक्कीच बदललेले असेल, यातही शंका नाही.