पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच
By Admin | Updated: February 4, 2015 23:20 IST2015-02-04T23:20:35+5:302015-02-04T23:20:35+5:30
नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी

पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच
वर्धा : नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या हवामान आधारित पीक विम्यासाठी अद्यापही पायपीट करावी लागत आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे हे वर्षभरापासून धडपत आहे. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत अनास्था दाखविली जात आहे.
जिल्ह्यात हवामानावर आधारित पीक विमा योजना गेल्या वर्षीच्या हंगामापासून सुरू झाली. गेल्या वर्षीचे नैसर्गिक संकट व पुन्हा या वर्षीच्या हंगामातील भर लक्षात घेता अनेक शेतकरी विम्याचा लाभ मिळावा, या अपेक्षेत आहे. परंतु प्रशासनातील तकलादू भूमिकेमुळे बहुतांश शेतकऱ्यांची पायपीट सुरूच आहे. धामणगाव (वाठोडा) येथील शेतकरी प्रवीण ठाकरे यांच्याकडे चार खातेदार मिळून वायफड शिवारात २१ एकर जमीन आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या हंगामात कापसाची पेरणी केली. त्यावेळी संपूर्ण कापूस पिकाचा विमा उतरविला. हप्त्याची १३ हजार ५०० रूपये रक्कम संबंधितांकडे भरून पावतीसुध्दा मिळविली. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिकांची वाट लागली. यामुळे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी, यासाठी त्यांनी संबंधितांकडे अर्ज दाखल केला.
परंतु त्यांना अद्यापही न्याय देण्यात आला नाही. त्यांनी न्यायालयातसुध्दा विम्याच्या रकमेसाठी दाद मागितली. न्यायालयाने पीक विम्याचा २ लाख रूपयांचा दावा मंजूर केला. परंतु त्यातील पूर्णत: रक्कम देण्यात आली नाही. यासाठी त्यांची अद्यापही पायपीट सुरू आहे. न्याय न मिळाल्याने सदर शेतकऱ्याने लोकशाही दिनात अर्ज दाखल केला होता.
शासन स्तरावरून शेतकऱ्यांसाठी विविध योजना दिल्या जातात. परंतु त्याची प्रत्यक्षरीत्या अंमलबजावणी केली जात नाही. हवामान आधारित पीक विमा योजना हे याचेच एक मूर्तीमंत उदाहरण आहे. अद्यापही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)