ओलितासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा
By Admin | Updated: December 28, 2015 02:21 IST2015-12-28T02:18:02+5:302015-12-28T02:21:04+5:30
शेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात ..

ओलितासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा
शेतकऱ्यांना भुर्दंड : सिंचनासाठी असलेल्या योजना ठरताहेत कुचकामी
विजय माहुरे सेलू
शेती सिंचनाखाली यावी म्हणून शासनामार्फत अनेक योजना राबविल्या जातात; पण त्या योग्यरित्या राबविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना जीवाचा आटापिटा करावा लागतो. हा प्रकार तालुक्यात पाहावयास मिळत आहे. पाटचऱ्या साफ व दुरूस्त केल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना शीतलहरीचा सामना करीत पाटचाऱ्या साफ करीत शेतापर्यंत पाणी न्यावे लागत असल्याचे दिसते.
सेलू तालुक्याला हरितक्रांतीचे स्वप्न दाखवित ५० वर्षांपूर्वी बोर प्रकल्प निर्माण करण्यता आला. बहुतांश कृषी क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी वितरिका, पाटचऱ्या, सायपण तयार करण्यात आले. शेतकरी यामुळे खरीप व रबी, अशा दोन्ही हंगामातील पिके घेऊ लागले. प्रारंभी काही वर्षे वितरिकांची साफसफाई नियमित केली जात होती. पाण्याचे नियोजन केले जात होते. सायपणवर दिवसा तसेच रात्रपाळीत कर्मचारी राहत होता. पाण्याचा अपव्यय होऊ नये, याचीही काळजी घेतली जात होती; पण ५० वर्षांपूर्वी असलेल्या वितरिका व पाटचऱ्यांच्या साफसफाई व डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याने याची दुरूस्तीच केली जात नाही. बहुतांश ठिकाणी वितरिकेच्या बाजूला असलेल्या शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त होते. पिकाचे ओलित करण्यासाठी शेतापर्यंत पाणी नेताना शेतकऱ्यांना रात्रीचा दिवस करावा लागतो. पाटचऱ्यांतून पाणी घेण्यासाठी कंबरभर खोल नालीत उतरून प्लास्टिक पिशव्या व दगडांची पाळ लावण्यासाठी आजही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
साफसफाई नसलेल्या वितरिकेत काटे, सरपटणारे प्राणी यांच्या वास्तव्याची भीती असली तरी शेतात पेरलेल्या पिकाला पाणी देऊन उत्पन्न घेण्याची आस असलेल्या शेतकऱ्याला शासकीय अनास्थेचा सामना करावा लागत आहे. बोर प्रकल्पाला निधीचा अभाव व कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगितले जाते. शासनाकडून सिंचन व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचे सांगण्यात येत असताना साध्या पाटचऱ्यांची दुरूस्ती होत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोरडवाहू शेती सिंचनाखाली आली; पण सध्या या व्यवस्थेला अखेरची घरघर लागली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना ओलित करणे कठीण झाले आहे. हा त्रास दूर करण्यासाठी शासन लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.