बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

By Admin | Updated: November 15, 2015 01:31 IST2015-11-15T01:31:18+5:302015-11-15T01:31:18+5:30

शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो.

Farmers' meeting in market committee | बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे हाल

पुलगाव येथील प्रकार : असुविधांमुळे शेतमाल राहतो उघड्यावर, पिण्याच्या पाण्याचाही अभाव
वर्धा : शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचा उल्लेख होतो. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी म्हणूनच कृउबा समितीची निर्मिती झाली; पण सध्या या बाजार समित्यांमध्येच शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. पुलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. साध्या पिण्याच्या शुद्ध पाण्याचीही सोय नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या समितीचे भिडी आणि देवळी हे दोन उपबाजार आहेत. प्रशस्त आवार असलेल्या अमरावती मार्गावर समितीचे मुख्य कार्यालय असून पंचधारा रोडवरही मोठी जागा आहे. बाजार समितीचा आवार मोठा असून गोदामांची निर्मिती करण्यात आलेली आहे. कित्येक वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या गोदामाची सध्या दुरवस्था झाल्याचेच दिसून येते. या गोदामाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
मुख्य कार्यालयत असलेल्या अमरावती मार्गावरील बाजार समितीच्या आवारात धान्य बाजार भरतो; पण पुरेशा सुविधा नसल्याने शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल होतात. पुलगाव येथे शहर, परिसरातील ग्रामीण भाग येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीस घेऊन येतात. धान्य घेऊन येणाऱ्या या शेतकऱ्यांना शेतमालाचा वजनकाटा करण्यासाठी बराच वेळ ताटकळावे लागते. लिलाव होईपर्यंत शेतमालाचे वजनच केले जात नसल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. शेतमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना एकतर घरूनच जेवणाचा डबा घेऊन यावा लागतो वा शहरात पोटाची भुक शमविण्याकरिता भटकंती करावी लागते. बाजार समितीच्या आवारात पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांची तहाणही भागविण्यास बाजार समिती असमर्थ असल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे.
बाजाराच्या आवारात कुठेही महिलांकरिता शौचालय, स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आलेली नाही. यामुळे महिला शेतकरी, मजूर वर्ग यांची गोची होते. पुलगाव बाजार समिती ही जुनी आणि जिल्ह्यात लौकिकप्राप्त आहे. या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणे अपेक्षित होते; पण संचालक मंडळ व सचिव त्याकडे लक्षच देत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी, अडत्ये, हमाल यांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. स्वच्छतागृह नाही, पिण्याचे पाणी नाही, जेवणाची सोय नाही यामुळे सर्वांचेच हाल होत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या पुलगाव बाजार समितीमध्ये सोयाबीन तारण योजना राबविली जात आहे. या योजनेमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेऊन येत आहेत; पण मालाचे वजन करण्याकरिता एक ते दोन दिवस लागत असल्याचे दिसते. वजन होईपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेतमाल उघड्यावरच ठेवावा लागतो. शेतमाल पावसाने ओला झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तारणासाठी आलेल्या व वजनकाटा न झालेल्या शेतमालाची व्यवस्था करणे गरजेचे आहे; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते. पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Farmers' meeting in market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.