अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट

By Admin | Updated: July 22, 2015 02:45 IST2015-07-22T02:45:21+5:302015-07-22T02:45:21+5:30

रसुलाबाद व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळाले नाही.

Farmer's literature visit to tehsildar for donation amount | अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट

अनुदानाच्या रकमेसाठी तहसीलदाराला शेती साहित्य भेट

प्रहारचे अभिनव आंदोलन : रसुलाबादचे शेतकरी लाल्याच्या अनुदानासह नैसर्गिक आपत्ती मदतीपासूनही वंचित
आर्वी : रसुलाबाद व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान मिळाले नाही. यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसीलदार मनोहर चव्हाण यांना शेतीपयोगी साहित्य भेट करण्यात आले. प्रहारच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या या अभिनव आंदोलनाने महसूल प्रशासनात खळबळ उडाली.
गतवर्षी कपाशीच्या पिकावर लाल्या रोगाचे आक्रमण झाले. शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची घोषणा केली. त्यानुसार रसुलाबाद येथील शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. यानंतर नैसर्गिक आपत्तीचे अनुदान घोषित करण्यात आले. तलाठ्याने कार्यालयात बसूनच शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. यादीत नावे असलेल्या शेकऱ्यांनाही अनुदान मिळाले नाही. गतवर्षी पाऊस न आल्याने रसुलाबाद येथील शेतकरी उत्पन्नास मुकला. शेतकऱ्यांना अनुदान घोषित झाले; पण रसुलाबादच्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कमच मिळाली नाही. या गावातील शेतकरी दरवर्षीच अनुदानापासून वंचित राहत असल्याने शेतकऱ्यांनी प्रहारकडे तक्रार केली. बाळा जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार मनोहर चव्हाण यांची सोमवारी भेट घेण्यात आली. यावेळी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सोबतच पिके डवरण्याकरिता वापरण्यात येणारा लाकडी डवरा, बैलांच्या गळ्यात बांधण्यात येणाऱ्या टिनमिन्या, रुमणे, तुतारी, बैलांचे दोर व अन्य शेतीपयोगी साहित्य भेट देण्यात आले. शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. पेरलेले बियाणे उगवले; पण पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणीची वेळ आली. ती कशी करावी, ही विंवचना असताना शासनाने घोषित केलेले अनुदानही मिळाले नाही. ते त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदार मनोहर चव्हाण यांनी निवेदन स्वीकारून अनुदानाची रक्कम न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या नावांची यादी त्वरित आणून द्या, मी स्वत: अनुदान का मिळाले नाही, याची चौकशी करून अनुदान देण्याची व्यवस्था करतो, अशी ग्वाही दिली. अनुदान न मिळाल्यास यानंतर आंदोलनात्मक मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा जगताप यांच्यासह रसुलाबाद येथील शेतकरी रमेश मांडवगडे, बद्रुद्दीन काजी, गजेंद्र आकडे, नरेश राऊत, प्रभाकर सावरकर, भास्कर देऊळकर, सुमीत्रा लोखंडे, गजानन वर्मा, किशोर टाके, घनश्याम क्षीरसागर, हरदास मेश्राम, लक्ष्मण ढोले, बिसमील्ला खा, विमला टाले, सुरेखा रघाटाटे, नरेश ढोके, युनूस वहीद खा, सैय्यद शमी, अर्थव गुल्हाणे यांच्यासह १०० च्या वर शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmer's literature visit to tehsildar for donation amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.