नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ
By Admin | Updated: July 31, 2016 00:39 IST2016-07-31T00:39:12+5:302016-07-31T00:39:12+5:30
नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

नव्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ
फणिंद्र रघाटाटे वर्धा
नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता शासनाच्यावतीने पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधानांनी यात असलेल्या जाचक अटी रद्द करून नव्याने सुधारित पीक विमा योजना सुरू केली. नव्या योजनेनुसार भरावा लागणारा हप्ता अत्यल्प असल्याने योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे; पण योजनेत सहभागी झालेल्यांना मिळणारे नुकसान एक खासगी कंपनी देणार असल्याने त्या कंपनीच्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
अर्जाकरिता शेतकरी भटकत असताना योजनेची अंतिम तारीख आली आहे. अर्जाची मागणी वाढत असल्याने शासनाच्यावतीने दोन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. पण ही मुदतवाढ शेतकऱ्यांच्या मागणीवरून नाही तर बँकांच्या संपामुळे देण्यात आल्याची माहिती आहे. पीक विमा योजनेची अंतिम तारीख आता २ आॅगस्ट करण्यात आली. असे असले तरी योजनेतील अटी व नियम दरदिवशी बदलत असल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आधी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीच वेगळी कार्यवाही करण्याची गरज नव्हती. कर्जाच्या हप्त्यातून बँक पीक विमा योजनेचा हप्ता कापून घेत होते. यावर्षी याशिवाय ज्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांना पंचायत समितीकडून ठरविलेला अर्ज भरून तो बँकेत जमा करणे आवश्यक केले. त्यानुसार सदर अर्ज मिळवून तो भरून बँकेत जमा केला. अशात कृषी सहायकांनी जी कंपनी विम्याचा लाभ देणार आहे, त्या कंपनीने योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांच्याद्वारे नियोजित केलेला अर्ज भरण्याबाबत शेतकऱ्यांना कळविले.
नुकसान भरपाई देणारी कंपनी पिकांची पाहणी सॅटेलाईटद्वारे करून नुकसानीचा निर्णय घेणार आहे. शासनाने योजनेबाबत प्रसिद्धी केल्याने शेतकरी या योजनेत सहभागी होत आहे. अशात कोट्यवधी रुपये खाजगी कंपनीच्या तिजोरीत जमा झाल्यावर खरच नुकसान भरपाई मिळेल की शेतकऱ्यांना लुटण्याचाच हा प्रकार आहे, अशी चर्चा असली तरी योजनेत सहभागी होणाऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे.
शेतकऱ्यांवर कृषी सहायकाच्या मागे धावण्याची वेळ
शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक असलेल्या अर्जाकरिता शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. सदर अर्ज कृषी सहाय्यकाजवळ उपलब्ध असून तो मिळविणे शेतकऱ्यांसाठी कटकटीचे झाले आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून त्यात शेतकरी व्यस्त आहेत. अशा व्यस्त कालावधीत शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.