अतिवृष्टीत शेती खरडून गेल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल
By Admin | Updated: August 22, 2015 02:18 IST2015-08-22T02:18:01+5:302015-08-22T02:18:01+5:30
मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली.

अतिवृष्टीत शेती खरडून गेल्याने शेतकरी कुटुंब हवालदिल
खरांगणा (मो.) : मोरांगणा येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेली शेती गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने खरडून निघाली. परिणामी पिके नष्ट झाली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहे.
तलाठी साजा क्र. ३० मधील शेतकरी सतीशलाल बालकराम बत्रा सर्व्हे नं. २४८/४ आराजी १.६२ हेक्टर, जितेंद्र सतीशलाल बत्रा सर्व्हे क्र. २४८/१ आराजी १.८८ हेक्टर आर व संतोषराणी बत्राा सर्व्हे क्र. २४८/४ आराजी १.७४ हे.आर. अशी या कुटुंबाची शेती आहे. यात कपाशी, तूर, सोयाबीन व ज्वारींची लागवड या कुटुंबीयांनी केली होती. पिके डौलदारपणे उभी असताना दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीत सदर पिके पूर्णत: वाहून गेली. शेतात ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक कंबरडेच मोडले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या शेतकऱ्यांच्या शेतीच्या उत्तरेकडील वरच्या भागातून वर्धा-आर्वी राजमार्ग गेला आहे. या मार्गावर शेतकऱ्याच्या शेताजवळच रपटा बांधण्यात आला. त्यामुळे डोंगरकपारीतून येणारे पाण्याचे लोट रपट्यातून मोठ्या प्रमाणात सरळ शेतात शिरले.
शेती पिकांसकट खरडून निघाली. यात सर्व कुटुंबाची ५.२८ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली. शेतकऱ्यांनी तहसीलदार जिल्हाधिकारी, तलाठी, यांना लेखी तक्रार दिली, पण आठ दिवसांचा कालावधी लोटूनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे सदर कुटुंब हवालदिल झाले आहे.(वार्ताहर)