भुयारी मार्गासाठी शेतकरी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 22:39 IST2019-01-24T22:37:47+5:302019-01-24T22:39:15+5:30
स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण समजली जात आहे.

भुयारी मार्गासाठी शेतकरी एकवटले
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक एकपाळा पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची मागणी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी व खासदार रामदास तडस यांनी मोक्का पाहणी केली. या भुयारी मार्गासाठी कास्तकारांनी चालविलेल्या संघर्षाची दखल घेवून गंडी यांची भेट महत्वपूर्ण समजली जात आहे.
देवळीतील एकपाळा पांदण रस्त्यावर दिलीप बिल्डकॉन भोपाळ या कंपनीच्यावतीने बोरी- तुळजापूर चार पदरी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. परंतु या पांदण रस्त्यावर भुयारी मार्गाची तरतुद न केल्याने एकपाळा शिवारातील शेकडो कास्तकारांची अडचण झाली आहे. देवळी तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना याबाबतचा अहवाल सादर करून कास्तकारांची मागणी रास्त असल्याचे सांगितले आहे. त्यातच या पांदण रस्त्यावरील बांधकाम उंच असल्याने या भागातील कास्तकारांचे शेतात जाणे येणे बंद झाले आहे. तसेच तीन कि़मी. अंतराच्या फेरा घेवून कठीण मार्गाने शेतात जावे लागणार असल्याचे अहवालात नमूद आहे.
तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध नकाशानुसार हा पांदण रस्ता सन १९०९-१० या वर्षापासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे. शंभर फुट रूंदीच्या या पांदण रस्त्याला मागील ११० वर्षांचा इतिहास असून याआधी एकपाळा शिवारासोबतच वाटखेडा, टाकळी, चिखली, अंदोरीला जाण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला जात होता. आदी सर्व माहिती खासदार रामदास तडस यांनी राष्ट्रीय महामार्गाचे तांत्रिक व्यवस्थापक गंडी यांना देवून भुयारी मार्गाची मागणी लावून धरली.
याप्रसंगी अजय देशमुख, अब्दुल जब्बार तंवर, मोहन ठाकरे, रवि कारोटकर, अशोक डाखोरे, सचिन वैद्य, गंगाधर कारोटकर व परिसरातील शेतकऱ्यांनी गंडी यांचे समोर बाजू मांडून लक्ष वेधले.
यापूर्वी एकपाळा येथील नागरिकांनी प्रशासनाला याबाबत निवेदन दिले होते. तसेच भिडी येथेही महामार्गाच्या कामामुळे अडचण निर्माण झाली होती. त्याबाबतही खा. रामदास तडस यांनी माहिती जाणून घेतली. अडचणींची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.