कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

By Admin | Updated: January 28, 2015 23:38 IST2015-01-28T23:38:43+5:302015-01-28T23:38:43+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने

Farmers' Elgar to buy cotton | कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार

हिंगणघाट : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस मार्केट यार्डमध्ये सीसीआयने कापसाची खरेदी बंद केली़ यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आमदारांच्या मध्यस्थीने कापसाची खरेदी पुन्हा सुरू करण्यात आली.
माल ठेवण्यासाठी जागा नसल्याने सोमवारपर्यंत (दि़२६) कापूस खरेदी होणार नसल्याचे पत्र सीसीआयने बाजार समितीला दिले. यानंतर पुन्हा पत्र देऊन २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी होणार नसल्याचे सांगितले; पण ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही़ यामुळे मंगळवारी (दि़२७) सकाळी ८ वाजतापासून कापसाच्या सुमारे ११०० ते १२०० गाड्या, ट्रक, ट्रक्टरची लांब रांग लागली़ यावेळी २९ जानेवारीपर्यंत कापूस खरेदी बंद असल्याचे सीसीआयने सांगताच शेतकरी संतप्त झाले. सीसीआय खरेरी करीत नसल्याने शेतकऱ्यांना ३६००-३७०० रुपये दराने खासगी व्यापाऱ्यास कापूस विकावा लागणार होता़ आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान अटळ होते़
७०० ते ८०० संतप्त शेतकऱ्यांनी आ़ समीर कुणावार यांचे घर गाठले़ सीसीआयला कापूस खरेदी करण्याचा आग्रह करण्याची मागणी केली़ कुणावार यांनी दखल घेत आकोट येथे सीसीआयचे अधिकारी मौर्या यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला; पण मौर्या यांनी कापूस ठेवण्यासाठी जागाच नसल्याने खरेदीस असमर्थता दर्शविली़ यावर त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दूरध्वनी करून कपाशीची खरेदी सुरू करण्याचा आग्रह धरला. यानंतर सीसीआयचे विदर्भ प्रमुख सिंग यांच्याशी संपर्क साधला़ ना. मुनगंटीवार, आ. कुणावार व सिंग यांनी कॉल कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्यानंतर सिंग यांनी कापूस खरेदीचे आदेश दिले़ या वाटाघाटीनंतर दुपारी १२ वाजतापासून कापूस खरेदीस प्रारंभ झाल्याने तणाव निवळला़ मंगळवारी तब्बल ३ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यामुळे खासगी व्यापाऱ्यांना माल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. अन्यथा लाखो रुपयाचा तोटा सहन करावा लागला असता.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Farmers' Elgar to buy cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.