शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

By Admin | Updated: November 14, 2016 00:53 IST2016-11-14T00:53:32+5:302016-11-14T00:53:32+5:30

हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे.

Farmer's Crop Insurance of Rs 14.48 Crore | शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

शेतकऱ्यांनी उतरविला १४.४८ कोटींचा पीक विमा

८० हजार १२५ प्रकरणे : ९७,०९३ हेक्टर क्षेत्राचा समावेश
प्रशांत हेलोंडे  वर्धा
हवामान आधारित आणि आता पंतप्रधान पीक विमा योजना शासनाकडून राबविली जात आहे. जिल्ह्यातील कर्जदार आणि गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा रिलायन्स या विमा कंपनीकडून काढला जात आहे. खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात सुमारे ५६ हजारांवर कर्जदार तर ५ हजार २८८ गैरकर्जदार शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी तब्बल १४ कोटी ४८ लाख रुपयांचा पीक विमा काढलेला आहे. यातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकात नुकसान सहन करावे लागल्याने त्यांनी विमा परताव्यासाठी अर्ज केल्याची माहिती आहे.
विदर्भातील बहुतांश शेती निसर्गावर अवलंबून आहे. काही वर्षांत सिंचन क्षेत्रात वाढ झाली असली तरी पावसाच्या कमी-अधिक प्रमाणाचा शेतातील पिकांवर परिणाम होतो. यामुळेच शासनाकडून पीक विमा योजना राबविल्या जातात. पूर्वी हवामान आधारित पीक विमा योजना होती. आता पंतप्रधान पीक विमा योजना राबविली जात आहे. या योजनेत शेतकऱ्यांना एकदाच विमा हप्ता भरावा लागतो. पिकांचे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले तरी विम्याच्या परताव्यासाठी प्रस्ताव सादर करता येतो. यासाठी कृषी विभागाच्यावतीने विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या हजेरीत सर्वेक्षण केले जाते. सदर प्रतिनिधी उपलब्ध होत नसल्यास कृषी विभागाचे सर्वेक्षण ग्राह्य धरले जाते. या सुविधेमुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. कर्जदार शेतकऱ्यांना तर पिकांचा विमा काढणे बंधनकारक करण्यात आले आहे; पण जिल्ह्यात गैरकर्जदार शेतकऱ्यांनीही विमा उतरविल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सुमारे ५६ हजारांवर शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांचा विमा उतरविला आहे. विमा हप्त्याची रक्कम वेगवेगळी असल्याने एका शेतकऱ्याची दोन ते तीन वेळा नोंद होत असल्याचे लीड बँकेकडून सांगण्यात आले आहे. हा आकडा विचारात घेतला तर जिल्ह्यातील ९१ हजार ५९५.८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला आहे. यासाठी ७४ हजार ८३७ प्रकरणांमध्ये कर्जदार असलेल्या शेतकऱ्यांनी १३ कोटी ७६ लाख, ४५ हजार ९४३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. गैरकर्जदार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमा योजनेचा लाभ घेतला आहे. यात ५ हजार २८८ शेतकऱ्यांनी आपल्या ५ हजार ४९७.७५८ हेक्टर क्षेत्रातील पिकांसाठी ७२ लाख १२ हजार ७१३ रुपयांचा विमा हप्ता अदा केला आहे. एकूण जिल्ह्यातील ८० हजार १२५ प्रकरणांमध्ये १४ कोटी ४८ लाख ५८ हजार ६५६ रुपयांचा विमा हप्ता संबंधित कंपनीला अदा करण्यात आला आहे.
विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाईची हमी मिळाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना शासकीय यंत्रणांचे सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले आणि शासकीय यंत्रणेने पंचनामाच केला नाही तर शेतकऱ्यांना विम्याचा परतावा मिळणे कठीण होते. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्याकरिता कृषी विभाग, महसूल विभाग आणि विमा कंपनीने पूढाकार घेत नुकसानाचा पंचनामा करून घेत सहकार्य करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Farmer's Crop Insurance of Rs 14.48 Crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.