मूठभर कापूस जाळून वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने केला शासनाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 13:17 IST2020-05-22T13:16:41+5:302020-05-22T13:17:38+5:30
कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले.

मूठभर कापूस जाळून वर्धा जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने केला शासनाचा निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: कापूस खरेदीबाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर कापूस जाळण्याचे आंदोलन केले. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता पुर्ण राज्यभर हजारो शेतकऱ्यांनी एकाच वेळेस गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंद केलेली शासकीय कापूस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धीम्या गतीने खरेदी सुरु आहे. तसेच एफ ए क्यू च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास , भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसासंबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी, पुर्ण महाराष्ट्रभर मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.
केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला आसला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकऱ्यांना सावरण्यासाठी काहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापूस जाळण्याचे आंदोलन लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून केले.