कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला, आरोपी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 15:48 IST2018-07-05T15:48:09+5:302018-07-05T15:48:48+5:30
पती-पत्नीचा कौटुंबिक वाद विकोपाला जावून पतीने चक्क पत्नीवर सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले.

कौटुंबिक वादातून पत्नीवर प्राणघातक हल्ला, आरोपी पतीला अटक
वर्धा : पती-पत्नीचा कौटुंबिक वाद विकोपाला जावून पतीने चक्क पत्नीवर सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना स्थानिक शिवाजी चौक परिसरात गुरूवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. दीपमाला साठे असे गंभीर जखमी महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शिवाजी चौक परिसरातील खाडे यांच्या घरी दीपमाला साठे ही किरायाने राहते. ती पशुसंवर्धन विभागात कनिष्ठ सहाय्यक लिपीक म्हणून कार्यरत असून नेहमीप्रमाणे ती आज कार्यालयात जात होती. दरम्यान दीपमालाचा पती प्रविण नागोराव साठे याने हातात कोयता घेवून थेट दीपमालावर हल्ला चढविला. यात दीपमाला ही जखमी झाल्याने तिला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. कौटुंबिक वादातूनच आर्शिवादनगर यवतमाळ येथील रहिवासी असलेल्या प्रविण साठे याने दीपमालावर सशस्त्र प्राणघातक हल्ला चढविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दीपमाला व प्रविण गत काही दिवसांपासून वेगवेगळे राहत होते. जखमीचे बयान शहर पोलीस ठाण्यातील शिपाई सतीश दुधाने यांनी नोंदवून घेतले. यवतमाळ येथील रहिवासी असलेला प्रविण हा अमरावती जि.प. मध्ये परिचर म्हणून कार्यरत आहे, हे विशेष. या प्रकरणी दीपमाला साठे यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२६, भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.
अवघ्या काही मिनीटातच आरोपीला घेतले ताब्यात
सदर घटनेची माहिती रामनगर ठाण्यात चालक म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर महाजन यांच्या पत्नी मिना यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांच्या पतीला दिली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी आपल्या हालचालिंना वेग देत या घटनेतील आरोपीला ताब्यात घेतले.