फळांबाबत ग्राहकांमध्ये केवळ गैरसमज
By Admin | Updated: May 10, 2015 01:39 IST2015-05-10T01:39:40+5:302015-05-10T01:39:40+5:30
डॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात.

फळांबाबत ग्राहकांमध्ये केवळ गैरसमज
पराग मगर वर्धा
डॉक्टर्स नेहमीच आहारात भरपूर फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु बदलते वातावरण आणि वाढती मागणी यामुळे ही फळे रसायनांनी पिकवली जात असावी, असा नागरिकांना समज असतो. यात सत्यता किती हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने वर्धा शहरातील फळाचे मुख्य व्यापारी व वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या सदस्यांची भेट घेऊन तसेच येथील फळे पिकवित असलेल्या स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी व्यापारी सदस्यांनी या प्रक्रियेबद्दल असलेल्या गैरसमजाविषयी असलेल्या भावना व्यक्त करीत अतिशय नैसर्गिक पद्धतीने ही फळे पिकविल्या जात असल्याचे सांगितले.
वर्धा शहरात इतवारा परिसरात असलेल्या वर्धा फुड मर्चंट असोसिएशनच्या माध्यमातून शहरात हंगामी फळांचा पुरवठा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केला जातो. यात मुख्यत्वे पपई, केळी, आंबा, तरबूज अशा फळांचा समावेश असतो. आंब्याचे उत्पादन जिल्ह्यात होत नसल्याने त्याची आयात केली जाते. कच्चा आंबा मागवून तो पिकविला जातो. त्यामुळे तो पिकवताना रसायनांचा वापर केला जात असावा असा सामान्यांचा नेहमीचा समज असतो. परंतु वास्तव वेगळे असून केवळ गैरसमजामुळे आम्ही बदनाम असल्याचे हे व्यापारी सांगतात.
फळांना इंजेक्शन कधीच दिले जात नाही
पपई, टरबूज आदी फळे पिकविताना तसेच त्यांना चांगला रंग येण्यासाठी इंजेक्शन टोचले जातात असाही समज नागरिकांमध्ये आहे. वास्तविकता, जर या किंवा कोणत्याही फळाला इंजेक्शन किंवा कुठलीही वस्तू टोचल्यास ही फळे दोन ते तीन तासातच खराब होतात. त्यामुळे असे कुठलेही इंजेक्शन दिले जात नसल्याचेही फळव्यापारी सांगतात. पपई, टरबूज आदी फळे ही पिकण्याच्या तयारीत असतानाच शेतकऱ्यांकडून घेतली जातात. उन्हाळ्यात ती लवकरच पिकतात. त्यामुळे ती रसायनाने पिकविण्याचा प्रश्नच नसतो असेही व्यापारी सांगतात.
जिल्ह्यात आंध्र प्रदेशमधून आंब्याची आयात केली जातो. केवळ बेगमपल्ली आंब्याचीच आयात केली जात आहे. दररोज जवळपास १२ टन आंब्याची आवक होत असते. यातील पाच ते सहा टन आंब्याची विक्री होत असते. आणलेल्या कच्च्या आंब्याची सर्वप्रथम पाहणी केली जाते. त्यानंतर दोन दिवस या आंब्याचा गरम जागेत माच घातला जातो. त्यानंतर हे आंबे कॅरेटमध्ये कागद पसरवून त्यामध्ये भरले जातात. यानंतर एका उबदार खोलीत हा आंबा पाच दिवसांसाठी व्यवस्थित झाकून ठेवला जातो. त्यानंतर सहाव्या दिवशी हा आंबा उघडला जातो. त्यानंतर पुन्हा सर्व आंब्यांची एकदा तपासणी करून तो विक्रीसाठी तयार होतो.