शेतांमध्ये तणनाशकाचा अतिवापर
By Admin | Updated: August 12, 2014 00:06 IST2014-08-12T00:06:20+5:302014-08-12T00:06:20+5:30
मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे.

शेतांमध्ये तणनाशकाचा अतिवापर
जमिनीची सुपिकता धोक्यात : मजुरांचा तुटवडा प्रमुख कारण
पवनार : मजुरांचा तुटवडा आणि निंदन, खुरपण यासाठी येणारा भरमसाठ खर्च या दुहेरी जाचातून सुटण्यासाठी शेतकरी तणनाशकाचा भरमसाठ वापर करताना दिसत आहे.
बाजारात मिळणारे ग्लायफोसेट नावाचे तणनाशक स्वस्त असल्यामुळे शेतकरी त्याचा सर्रास वापर करतात. हाय जॅक राऊंड अप, ग्लायसेल या विविध नावाने उपलब्ध असलेल्या या तणनाशकाच्या वापरावर अमेरिकेसारख्या राष्ट्राने बंदी घातली आहे. या औषधाच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
आपल्या देशात कृषीविषयक कुठलेही निश्चित धोरण नसल्यामुळे काही बाबींचा अतिरेक होताना दिसतो. भारतीय शेतकरी शास्त्रीय दृष्ट्या अनभिज्ञ असल्यामुळे खर्चात बचत होण्यासाठी तो विविध क्लूप्त्या वापरत असतो. कपाशीसारख्या पिकासाठी हे तणनाशक चालत नसतानासुद्धा गार्ड वापरून सदर पिकामध्ये फवारणी केली जाते. बी. टी. कापूस आल्यामुळे कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. पर्यायाने बाजारातील कीटकनाशकाच्या खपावर त्याचा परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी शेतकऱ्यांची हीच नाडी ओळखून तणनाशकाचे संशोधन केले व शेतकऱ्यांमध्ये त्या बाबतीत जागृती करून, त्यांची मानसिकता तयार केली.
आजघडीला बाजारात सर्वात जास्त तणनाशक विकली जातात. भविष्यात तणनाशकाच्या अति वापराचा काय परिणाम होईल याचा विचार कुणीही करायला तयार नाही. शासनाने शेतकऱ्यांमध्ये जागृती करून शेतकऱ्यांना याचे दूरगामी परिणाम समजावून सांगणे गरजेचे आहे. एकीकडे शासन राऊंड अप रेडी बी टी कॉटनला परवानगी नाकारते तर दुसरीकडे तणनाशकाच्या वापरावर मात्र निर्बंध घालत नाही. त्यामुळे कृषी खाते केवळ नावापुरतेच राहिले आहे का असा प्रश्न नागरिक व्यक्त करतात. अनुदानाचे वाटप व नुकसानीचा सर्व्हे करणे एवढेच काम त्यांचेकडे शिल्लक असल्याचे बोलल्या जात आहे. कृषी सहाय्यक कधीच गावामध्ये येताना दिसत नाही. एका कृषी साहाय्यकाकडे १५ ते २० गावे असतात. याचा फायदा घेत तोही कुठल्याच गावात जात नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कृषी खात्याच्या योजनाही सर्वसाधारण शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे वास्तव आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी सांगितली जाते मात्र पावसाचा एक थेंबही पडत नाही. या सर्व परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देत तणनाशक न वापरण्यावर व्यापक जागृती करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)