गावखाऱ्या झाल्या नामशेष ले-आऊटचा विळखा

By Admin | Updated: March 19, 2015 01:41 IST2015-03-19T01:41:01+5:302015-03-19T01:41:01+5:30

गावालगत असलेली शेती गावखारी म्हणून ओळखली जात होती़ अलिकडे या शेत जमिनीवर घरे उभी राहिल्याने गावखारी नामशेष झाली आहे़ आजच्या युवापिढीपासून ‘गावखाऱ्या’ हा शब्दही दूर झाल्याचेच दिसते़

Extinction breaks out after the villagers | गावखाऱ्या झाल्या नामशेष ले-आऊटचा विळखा

गावखाऱ्या झाल्या नामशेष ले-आऊटचा विळखा

सेलू : गावालगत असलेली शेती गावखारी म्हणून ओळखली जात होती़ अलिकडे या शेत जमिनीवर घरे उभी राहिल्याने गावखारी नामशेष झाली आहे़ आजच्या युवापिढीपासून ‘गावखाऱ्या’ हा शब्दही दूर झाल्याचेच दिसते़
शहरापासून एक ते दीड किमी अंतरावर असलेल्या शेतजमिनी या १० वर्षांच्या कालावधीत ले-आऊट मालकाच्या कब्जात गेल्या आहे़ आज याच गावखाऱ्यावर सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या असून नव-नवीन नगर वसले आहे. सेलू तालुक्यात सेलू या गावाचे रूपांतर शहरात झाले. सेलू येथून सुकळी (स्टे.), रमणा, वडगाव व घोराडकडे जाणाऱ्या मार्गावर शेकडो एकर जागेत ले-आऊट पडले़ या शहराच्या सभोवताल एक ते दीड किमी अंतरापर्यंत क्षेत्रफळात वाढ झाली असली तरी बागायती व सुपिक जमिनीच्या असलेल्या गावखाऱ्यांचे महत्त्वच कालबाह्य झाले आहे.
तालुक्यात हिंगणी, केळझर, दहेगाव (गो.), महाबळा, येळाकेळी आदी बाजारपेठांची असलेली गावे ले-आऊटच्या माध्यमातून आपल्या सीमा वाढवित आहेत़ एकेकाळी या गावखाऱ्यांना अत्यंत महत्त्व होते. गावात लग्न समारंभ असला तर रेंगीने येणारी वरात आपले बैल याच गावखाऱ्यांत बांधत होते़ गावखाऱ्यांत असलेली आमराई वऱ्हाड्यांना दिलासा देत होती; पण काही गावखाऱ्यांवर शासकीय पट्टे पाडण्यात आले तर काही ले-आऊट पाडून भूखंड विकले गेले़ आज या गावखाऱ्या नामशेष झाल्या असून हा शब्दही कालांतराने कालबाह्य होत आहे.
शिदोरी, न्याहरी शब्दाचा प्रयोग कालबाह्य होत असताना गावखारी नामशेष झाल्याने जुनी वस्ती, नवी वस्ती, असा शब्दप्रयोग होताना दिसत आहे. गावालगत असलेल्या गावखाऱ्यांना चांगली किंमत येत असून शेतकरी सततच्या नापिकीमुळे शेत विकण्यालाच महत्त्व देताना दिसत आहे़ या तालुक्यात याच शेतीवर ले-आऊट पाडून स्केअर फुटाच्या मापाने भूखंड महागड्या किमतीत विकले जात आहे़
मागील हंगामात आणि चालू हंगामात ज्या शेतात पीक घेण्यात आले होते, ती शेतीही पाहता-पाहता कागदोपत्री अकृषक बनविली जात असल्याचे दिसते़ या जमिनीचे अकृषक प्रमाणपत्रही ग्रामपंचायती सहजरित्या उपलब्ध करून देतात़ यामुळे सदर जमिनीवर ले-आऊटही पडतात़ ही प्रक्रिया झपाट्याने होत असल्याने गावखाऱ्यांचे महत्त्व नामशेष होत आहे.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Extinction breaks out after the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.