भाजपविरोधात बोलणे पडले महागात; शेतकऱ्याच्या तोंडाला फासले काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST2022-01-09T05:00:00+5:302022-01-09T05:00:22+5:30
केंद्रीय मंत्री गडकरी हे हिंगणघाट येथे १२ डिसेंबरला आले होते. याच्या एक दिवसापूर्वी प्रवीण महाजन याने आ. कुणावार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विदर्भाच्या मुद्द्यावर मागणी करायची असून, निवेदन देऊन त्यांना शाई फासणार असल्याचे सांगितले होते. ती ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. मात्र, त्यानंतर प्रवीण महाजन याने सोशल मीडियावर माफीनाम्याची पोस्टही टाकली होती.

भाजपविरोधात बोलणे पडले महागात; शेतकऱ्याच्या तोंडाला फासले काळे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भारतीय जनता पक्षाच्या नेतेमंडळींविरुद्ध बोलणे एका शेतकऱ्याला चांगलेच महाग पडले असून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी चक्क शेतकऱ्याला घेराव घालून त्याच्याच तोंडाला काळे फासले. ही घटना आरंभा शेतशिवारात घडली. याप्रकरणी शेतकरी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली. प्रवीण महाजन हा आरंभा परिसरात असलेल्या शेतशिवारात जनावरांना मलमपट्टी करीत होता. दरम्यान, अज्ञात व्यक्ती आली आणि तुम्ही प्रवीण महाजन आहे का, अशी विचारणा करून तेथून निघून गेला. काही वेळानंतर हिंगणघाट येथील भाजपचा कार्यकर्ता अंकुश ठाकूर आणि त्याचे काही सहकारी एका चारचाकी वाहनातून आले आणि प्रवीणला घेराव घातला आणि प्रवीणला तुम्ही गडकरी साहेबांना काळे फासणार होते असे म्हणून अंकुश ठाकूर याने कानशिलात लगावून हातातील काळ्या पावडरने तोंडाला काळे फासून भाजपच्या नेत्यांविरुद्ध बोलल्यास जिवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी प्रवीण महाजन याने हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.
असे होते प्रकरण...
- केंद्रीय मंत्री गडकरी हे हिंगणघाट येथे १२ डिसेंबरला आले होते. याच्या एक दिवसापूर्वी प्रवीण महाजन याने आ. कुणावार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विदर्भाच्या मुद्द्यावर मागणी करायची असून, निवेदन देऊन त्यांना शाई फासणार असल्याचे सांगितले होते. ती ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. मात्र, त्यानंतर प्रवीण महाजन याने सोशल मीडियावर माफीनाम्याची पोस्टही टाकली होती.
काळे फासल्याचा व्हिडिओ व्हायरल...
- भाजपचे अंकुश ठाकूरसह त्याच्या काही मित्रांनी शेतकरी प्रवीण महाजन यांच्या तोंडाला काळं फासून भाजपच्या मोठ्या नेत्यांची बदनामी करायची नाही, असे म्हणत प्रवीण महाजन यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतून दोघेजण प्रवीण महाजन यांच्या तोंडाला काळे फासत असल्याचे दिसून येत आहे.