केंद्र वाढवा पण, पर्यायी व्यवस्थेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:01 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:01:08+5:30
जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने प्रत्येक नोंदणी केंद्रावरील शेतकऱ्यांची यादी वाढतच आहे.

केंद्र वाढवा पण, पर्यायी व्यवस्थेचे काय?
आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भाव वाढीच्या प्रतिक्षेत असंख्य शेतकऱ्यांनी कापूस घरातच भरुन ठेवला. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातच लॉकडाऊन करण्यात आल्याने कापूस खरेदीला ब्रेक लागला. परिणामी लाख मोलाच सोनं कवडीमोल भावात विकण्याची वेळ आली. जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने प्रत्येक नोंदणी केंद्रावरील शेतकऱ्यांची यादी वाढतच आहे.
जिल्ह्यात आठ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत वायगाव, देवळी, सेलू, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे), समुद्रपूर, खरांगणा व रोहणा या आठ केंद्रावर सीसीआयची कापूस खरेदी सुरु आहे. यासोबतच महाकॉकडूनही कापसाची हमीभावात कापूस खरेदी होत आहे. जिल्ह्यात सीसीआय, महाकॉट तसेच करार केलेल्या २५ जिनिंग-प्रेसिंगच्या माध्यमातून जवळपास २६ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. अद्यापही आठही तालुक्यातील कापूस उत्पादकांकडे ५ ते ६ लाख कापूस शिल्लक आहे. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन झाल्यामुळे कापूस खरेदीचा ओघ मंदावला. त्यामुळे कापूस उत्पादकांची चिंतेत आणखीच भर पडली. खरीप हंगाम पंधरा दिवसावर आल्याने या दिवसात कापूस विकण्यासाठी धडपड करायची की खरिपाची तयारी करायची, खरीपाची तयारी करायची म्हटली तर बी-बियाण्यांकरिता पैशाची गरज आहे. कापूसच घरात असल्याने पैसे तरी आणणार कुठून, असे अनेक प्रश्न सध्या शेतकºयांना भांडावून सोडत आहे. शेतकऱ्यांच्या या अवस्थेचा विचार करुन सीसीआयकडून कापूस खरेदी सुरु करण्यात आली. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे दररोज मोजक्याच गाड्या घेतल्या जात असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी चांगलीच वाढली आहे. सीसीआयचे मोजके केंद्र, गाड्याचीच आवकही मोजकीच मात्र, नोंदणीकृती शेतकऱ्यांची संख्या असंख्य असल्याने कापूस खरेदीचा प्रश्न आता दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्वत्र मान्सुनचे वेध लागल्याने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकºयांचा कापूस खरेदी व्हावा, या जिल्ह्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची एकमुखी मागणी होत आहे. तसेच पर्यायही सुचविले जात आहे.
हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा
जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरु होत आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस खरेदी करुन त्यांना मोबदला त्वरीत देने आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केल्यानंतर सात दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम देण्याची व्यवस्था करण्यात यावी. अनेक व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमीभावामध्ये कापूस खरेदी करुन तो कापूस सिसीआयला विकल्या जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन सोमवारी खासदार रामदास तडस यांनी भारतीय कपास निगमचे मुख्य महाव्यवस्थापक यांना अकोला येथील महाव्यवस्थापक यांच्या माध्यमातून देण्यात आले.
जिनिंग-प्रेसिंगची कामगारांनी वाढविली अडचण
जिल्ह्यातील सर्व कापूस खरेदी करण्याकरिता जिनिंग-प्रेसिंगमध्ये सीसीआयची कापूस खरेदी सुरु करण्याची मागणी होत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील जिनिंगमध्ये काम करणारे परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेल्याने आता मजुरांची वानवा आहे. स्थानिक मजुरांना जास्त मजुरी देऊनही ते जिनिंगमध्ये काम करायला तयार नाही. एका जिनिंगमध्ये गाडी खाली करणे, कापसाची गंजी लावणे, जिनिंग प्रोसेसिंग करणे, सरकी भरुन लोडींग करणे, गाठी लोडींग करणे आदी कामाकरिता दररोज ५० ते ६० मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे या काळात हे मजूर आणाणचे कुठून असा प्रश्न जिनर्सने उपस्थित केला आहे. पण, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता जिनर्स व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून तोडगा काढण्याची गरज आहे.
गाड्यांची संख्या वाढवावी
वर्धा सहित संपूर्ण विदर्भात कापूस जास्त प्रमाणात होत असतो, पंरतु कोविड-१९ महामारीमुळे विदर्भातील भारतीय कपास निगमची कापूस खरेदी कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक आहे. त्यामुळे वर्ध्यासह संपूर्ण विदर्भात कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात यावी. लॉकडाऊन ३.० मध्ये कापसाची खरेदी सुरु झाली परंतु, खरेदी केंद्रावर दर दिवसाला ५० गाड्यापर्यंत शेतकºयांचा कापूस खरेदी केला जातो. या गतीने कापूस खरेदी केल्यास संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणे शक्य होणार नाही. यामध्ये वाढ करुन दररोज १५० ते २०० गाड्या कापूस खरेदी करण्याची मागणी होत आहे.
वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे इतर जिल्ह्यातील सीमेवर शेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्धा जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावर नोंद केलेली आहे परंतु, त्यांचा कापूस खरेदी केंद्रावर आणण्याकरिता त्यांना जिल्हा हद्दीवर अडविण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आणण्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आल्याने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर कापूस घेऊन जाण्याकरिता परवानगी देण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.