कार्यकर्त्यांना पोरकी करणारी ‘एक्झिट’
By Admin | Updated: November 16, 2015 00:35 IST2015-11-16T00:35:05+5:302015-11-16T00:35:05+5:30
प्रमोद शेंडे हे नाव कानी पडताच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा थरकाप उडायचा. ही दहशत नव्हती, तर त्यांची विकासासाठी असलेली तळमळ त्यातून अधोरेखीत होत होती.

कार्यकर्त्यांना पोरकी करणारी ‘एक्झिट’
राजेश भोजेकर वर्धा
प्रमोद शेंडे हे नाव कानी पडताच प्रशासनातील अधिकाऱ्यांचा थरकाप उडायचा. ही दहशत नव्हती, तर त्यांची विकासासाठी असलेली तळमळ त्यातून अधोरेखीत होत होती. मतदार संघावर मजबूत पकड आणि प्रशासनावर वचक अशी ख्याती असलेल्या लोकनेत्याची ‘एक्झिट’ तमाम चाहते व कार्यकर्त्यांना पोरकेपणा देऊन गेली.
रुबाबदार व्यक्तिमत्वाचे धनी असलेले प्रमोद शेंडे यांची राजकारणातील एन्ट्रीही तितकीच दमदार होती. राजकीय जीवनाची वाटचाल सुरू केल्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. १९७८ ला त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत पाऊल ठेवले. यानंतर वर्धा मतदार संघासाठी विकासाचे द्वारच उघडे झाले. त्यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे आजही मजबूतीची साक्ष देत आहे. कामे करवून घेण्याची त्यांची हातोटी होती. कोणतेही विकास काम असो ते स्वत: त्या ठिकाणी खुर्ची टाकून बसत आणि काम करवून घेत. त्यातच त्या कामाचा मजबूतपणा लक्षात घेण्यासारखा होता. याच कारणाने जनतेनेही त्यांच्या आपला नेता म्हणून भरभरुन प्रेम केले. तब्बल सहावेळा त्यांनी वर्धा विधानसभा मतदार संघाचे नेतृत्त्व केले.ते याच प्रेमाच्या जोरावर. याच बळावर त्यांनी राज्याच्या राजकारणातही वेगळी छाप सोडली. परखड आणि स्पष्टवक्ता असलेला नेता म्हणून ते महाराष्ट्राच्या जनतेला परीचित झाले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात कृषी व लाभ क्षेत्र राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी पदाला न्याय दिला. तब्बल दहा वर्षे विधानसभेचे उपाध्यक्ष पद भुषविले. हा वर्धा मतदार संघातील जनतेचा सन्मान होता. ही पदे भुषवतताना त्यांनी आपला परखड बाण्याशी तडजोड केली नाही. विधानसभाही आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे गाजविली.
उपाध्यक्ष असताना वर्धा मतदार संघात विकास कामे करताना अडचण कधीच आली नाही. त्यांनी ज्या आमदार वा मंत्र्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी दिले तेसुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हते. सहाव्यांदा ते आमदार झाल्यानंतरचा काळ मात्र त्यांच्यासाठी वेदनादायक ठरला. या नेत्याने आपले अख्ख आयुष्य जनतेसाठी वेचले. त्यांचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाले. शरीर त्यांना साथ देत नव्हते. परिणामी ते सातव्यांदा विधानसभा निवडणूक लढू शकले नाही. चिरंजीव शेखर शेंडे यांना जनतेनी निवडून दिलेले बघायचे आहे ही त्यांची शेवटची इच्छा होती. हे स्वप्न अपूर्ण ठेवूनच त्यांनी जगाचा निरोप घेतला. या लोकनेत्याच्या निधनाच्या वार्तेवर त्यांच्या चाहत्यांचा विश्वासच बसत नव्हता. ते या दु:खद बातमीची शहानिशा करण्यासाठी धडपडत होते. मागील साडेपाच वर्षे ते जनसंपर्कात नसतानाही त्यांच्यावरील जनतेचे प्रेम तसुभरही कमी झाले नव्हते. असंख्य जनसमुदायांच्या साक्षीने सुरू झालेला या लोकनेत्याचा अखेरचा प्रवासही हेच सुचवत होता.
ते आयुष्यभर पक्षासाठी झटले. पक्षाच्या पडतीच्या काळातही ते एकनिष्ठ राहिले. अखेरचा श्वासही काँग्रेसचेच नेते म्हणून घेतला. त्यांच्या जाण्याने वर्धा जिल्ह्याचीच नव्हे, तर विदर्भाची काँग्रेस एका दमदार नेत्याला मुकली आहे. ते अंथरुनावर असले तरी कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांचा वास होता. त्यांचा सहवास जाणवणारा होता. पाठीवर हात असल्याचा आभास होता. हा आभासच आता हरपल्याने कार्यकर्ते पितृतुल्य नेतृत्त्वाला पोरके झाले आहे. ही पोकळी भरुन निघणे कठिणच हे भाव या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या तमाम कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते.