आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा सभेवर बहिष्कार
By Admin | Updated: August 26, 2015 02:09 IST2015-08-26T02:09:00+5:302015-08-26T02:09:00+5:30
तालुका आरोग्य कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पेंटावॅलंट लस प्रशिक्षण तसेच तालुक्यातील कार्याची माहिती घेण्याकरिता आढावा सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा आढावा सभेवर बहिष्कार
देवळी येथील प्रकार : कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन नाही
देवळी : तालुका आरोग्य कार्यालयामार्फत आरोग्य कर्मचाऱ्यांचे पेंटावॅलंट लस प्रशिक्षण तसेच तालुक्यातील कार्याची माहिती घेण्याकरिता आढावा सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षण संपताच सुरू होणाऱ्या आढावा सभेवर गत तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला.
लसीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आढावा सभेला सुरुवात होणार होती. अशा वेळेस तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी आढावा बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले. वेतन नसल्याने आरोग्य कर्मचारी हा आर्थिक अडचणीत सापडल्याने मंगळवारपासून कुठल्याही प्रकारची रिपोर्टींग, सभा तसेच मासिक डाटा एंट्री आॅनलाईन न करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. वेतनासाठी आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट घेवून वेतन व इतर प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात केली; परंतु कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न मिळाल्यामुळे नाईलाजाने संघटनेने वहिष्काराचा निर्णय घेतल्याचे तालुका अध्यक्ष प्रमोद लकडे व तालुका सचिव प्रशांत आदमने यांनी सांगितले. जोपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकित वेतन मिळणार नाही तो पर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचा बहिष्कार कायम राहील, असे यावेळी सांगण्यात आले. या बहिष्काराच्यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, ममता कांबळे, आशा पेंदोरे, विकास माणीकुळे, दिनेश भगत, दिनेश भारती, अर्चना बोबडे, शेख हुशेन, सुर्यकांत वाघुले, हेमंत उघडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
लस चिमुकल्यांशी संबंधित
पेंटावॅलंट लस ही नवीन असून ती चिमुकल्यांकरिता आहे. यामुळे त्याचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनी घेतले आहे. कर्मचारी व प्रशासनात असलेल्या वादाचा त्रास नागरिकांना होणार नाही असे यावेळी आंदोलक म्हणाले. कर्मचाऱ्यांनी फक्त कार्यालयीन अहवाल, बैठकीवर बहिष्कार घालत शासनाकडे केलेल्या कामाची रिपोर्टींग म्हणजेच मासीक डाटा एन्ट्री आॅनलाईन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.