नेत्रदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
By Admin | Updated: August 27, 2015 02:17 IST2015-08-27T02:17:54+5:302015-08-27T02:17:54+5:30
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे.

नेत्रदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा
निवृत्ती राठोड : नेत्रदान पंधरवडा जनजागृती रॅली
वर्धा : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे. पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.
पंधरवड्याची सुरूवात जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी या पंधरवड्याचा उद्देश समजावून सांगताना डॉ. राठोड बोलत होते. रॅलीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. एस. बी. अंधारे, नेत्र विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. सुटे, नेत्र चिकित्सा अधिकारी व्ही. सी. रामटेके, ए. एस. वरघट, नेत्रदान समुपदेशक प्रफुल काकडे व जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.
डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदान पंधरवड्यात मरणोपरांत नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. देशात १२ लाख व्यक्ती अंध आहेत. वेगवेगळ्या बुब्बुळाच्या आजाराने दरवर्षी २० हजार अंध व्यक्तींची यात भर पडत आहे. बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींना नेत्रदानाद्वारे दृष्टीलाभ होऊ शकतो. किंबहुना बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींसाठी बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच उपाय आहे.
आजच्या परिस्थितीत देशात ४५ हजार ते ५० हजार नेत्रगोलके मरणोपरांत नेत्रदानातून प्राप्त होतात. हे प्रमाण अधिक वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टीने पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रॅलीत शहरातील अनेकांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)