३.६६ लाख क्विंटल तुरीचे होणार उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:11+5:30
शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला.

३.६६ लाख क्विंटल तुरीचे होणार उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून सध्या पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. असे असले तरी गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात सुमारे ३.६६ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होईल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळवा अशी अपेक्षा तूर उत्पादकांना आहे.
शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळी वातावरणादरम्यान काही प्रमाणात तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर ढगाळी वातावरण जिल्ह्यातून हटल्याने या किटकाचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र, मागील तीन दिवसांपासून पुन्हा जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. हे काही दिवस पुढे असेच कायम राहिल्यास शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव तूर पिकावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर काही शेतकºयांकडून तूर पीक कापणीच्या कामाला गती दिली जात आहे. यंदाच्या वर्षी हेक्टरी सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.
६१ हजार हेक्टरवर तुरीची लागवड
मागील वर्षी ६० हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. तर यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. सरासरी प्रती हेक्टर ६ क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात ६१ हजार हेक्टरवर तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. प्रती हेक्टर सहा क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी ढगाळी वातावरण हटल्यावरच पिकाची कापणी करावी. त्यामुळे संभाव्य नुकसान टळेल.
- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.