७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:09+5:30
विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते.

७५७ अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्या सर्वसाधारण मतदार नोंदणीचा कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आतापर्यंत तब्बल १० हजार ८६२ नागरिकांनी तालुकाकचेरीतील निवडणूक विभागाकडे नाव नोंदविणे, नाव कमी करणे, नावात दुरूती करणे, पत्ता किंवा यादी भाग क्रमांक बदलविण्यासाठी रितसर अर्ज केले आहेत. सदर अर्जांची छानणी युद्धपातळीवर सुरू असून ७५७ अर्जामध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने अर्जदारांना एसएमएस करण्यात आले आहेत. सदर त्रुटींची पूर्तता वेळीच न केल्यास अर्जदाराला मतदानापासूनच वंचित राहवे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणखी काही नव मतदार असल्याचे आणि त्यांनी नोंदणीच केली नसल्याचे पुढे आले होते. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन नव्याने मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या नव्या मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार १२ एप्रिल २०२० पर्यंत नागरिकांना नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून २० फेबु्रवारीपर्यंत नाव नोंदणीसाठी १ हजार ८४०, नाव कमी करण्यासाठी ४ हजार ४९२, नावात दुरूस्तीसाठी ३ हजार ९६७ तर पत्ता किंवा यादी भाग बदलासाठी ५६३ व्यक्तींनी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. या अर्जाची छानणी सध्या युद्धपातळीवर होत असून ७५७ अर्जांमध्ये त्रुट्या आढळून आल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या अर्जात त्रुटी आढळली त्या व्यक्तीस त्रुटीबाबतची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली आहे.
५७२ व्यक्तींनी सादर केली नाही ‘रेफरन्स कॉपी’
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर अनेक व्यक्ती करतात. पण ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदाराने रेफरन्स कॉपी तालुक्याच्या निवडणूक कार्यालयात वेळीच सादर करणे क्रमप्राप्त आहेत. पण ऑनलाईन पद्धतीचा वापर करून अर्ज करणाऱ्या ५९२ व्यक्तींपैकी सुमारे ५७२ अर्जदारांनी रेफरन्स कॉपीच वर्धा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर केलेले नाहीत. रेफरन्स कॉपी न सादर करणाऱ्यांची त्रुट्यांअभावी नोंदणीच होणार नसल्याचे सांगण्यात आले.
मतदान केंद्रांवर होताहेत याद्या प्रसिद्ध
तालुका प्रशासनाच्या निवडणूक विभागाकडून अर्ज नमुना सात प्राप्तचे नमुना १० मधील २८ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तर नमुना आठ प्राप्तचे नमुना ११ मधील ७१ याद्या मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर नागरिकांना आक्षेप नोंदविता येणार आहे.
नव मतदारांची नोंदणी व्हावी. शिवाय अचूक मतदार यादी तयार व्हावी यासाठी निवडणूक विभागाच्या सूचनेवरून मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. ज्या अर्जात त्रुट्या आढळल्या त्या अर्जदारांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांनी त्रुट्यांची वेळीच पूर्तता करणे क्रमप्राप्त आहे.
- भगवान वनकर, नायब तहसीलदार, निवडणूक वर्धा.