शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
By Admin | Updated: March 14, 2015 02:07 IST2015-03-14T02:07:45+5:302015-03-14T02:07:45+5:30
शहरात पालिका व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली.

शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
वर्धा : शहरात पालिका व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी राबविण्यात आली. सकाळी बजाच चौक व आंबेडकर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने काढण्यात आली. बाजारातील दुकाने बंद असल्याने या भागात उद्या शनिवारी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पालिका व पोलीस विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमुळे रहदारीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी पालिकेकडे केल्या होत्या. शिवाय तशाच तक्रारी पोलीस विभागाकडेही करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत ही मोहीम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मोहीम राबविण्यापूर्वी पोलीस व पालिकेच्यावतीने या दुकानमालकांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यांना या नोटीसात दुकान हटवून जागा मोकळी करण्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यांच्याकडून कुठलीही कार्यवाही करण्यात आली नव्हती. यामुळे आज ही मोहीम राबविण्यात आल्याची माहिती यावेळी नगर अभियंता सुधीर फरसोले व वाहतूक पोलीस निरीक्षक काळे यांनी दिली.
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान पाडण्यात आलेल्या दुकानातील साहित्य जप्त करून त्यांना दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दंड आकारून हे साहित्य व्यावसायिकांना परत करण्यात येणार असल्याचही अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी बजाज चौकातील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यावेळी कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बजाज चौक व बसस्थानकासमोर कच्ची दुकाने तयार करून पोट भरणाऱ्यांवर शासनाच्यावतीने कारवाई करण्यात येते. बाजार परिसरात असलेल्या मोठ्या व्यवसायिकांवर शासनाच्यावतीने कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप अतिक्रमण काढण्यात आलेल्या व्यवसायिकांकडून करण्यात आला. यावर बाजार परिसरातील सर्वच अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
शनिवारी शहरातील मुख्य मार्गावर असलेले अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यात पालिकेकडून नियमांची अंमलबजावणी होते की केवळ छोट्या व्यवसायिकांवरच कारवाई करण्यात आली, याचा खुलासा होणार आहे. (प्रतिनिधी)