अतिक्रमणाचा बाजार

By Admin | Updated: August 23, 2015 02:19 IST2015-08-23T02:19:32+5:302015-08-23T02:19:32+5:30

शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे.

Encroachment market | अतिक्रमणाचा बाजार

अतिक्रमणाचा बाजार

वर्धा : शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे. यात शहराचा श्वास मांत्र कोंडला जात असल्याचे दिसते. सध्या शहरातील अतिक्रमणात जागोजागी वाढच होत असल्याचे दिसते. बाजार ओळींमध्ये तर याचा कळसच गाठल्याचे चित्र आहे. भाजी बाजारासाठी लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला परिसर देण्यात आला आहे; पण सध्या भाजीविके्रते आतमध्ये कमी आणि रस्त्यावरच अधिक दिसून येतात. यामुळे रस्ते निमूळते झाले असून परिसरातील अस्वच्छताही वाढीस लागली आहे. यात बाजाराची व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसते.
ंशहरातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला भाजी बाजार गोल बाजार म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा परिसर भाजी बाजाराकरिता देण्यात आलेला आहे. टिळक पुतळा असलेल्या कुंपण केलेल्या भागातच बाजार भरावा, असा उद्देश होता; पण सध्या भाजीविक्रेते त्या परिसरात कमी आणि रस्त्यावरच अधिक दुकाने लावत असल्याचे दिसते. टिळक मार्केट परिसरामध्ये काही दुकाने लागलेली आहेत तर उर्वरित विक्रेते त्या जागेचा उपयोग केवळ माल ठेवण्याकरिता करीत असल्याचे दिसून येते. पुतळ्यासमोरील उर्वरित परिसरात चार चाकी बंड्या उभ्या केल्या जात असल्याचे दिसून आले. याच बंड्यांवर काही जुगारी, सट्टापट्टी व्यवसाय करणारेही दिसतात. शिवाय या बाजाराच्या सभोवतालच्या परिसरात अनेक दारूविक्रेतेही सक्रीय आहेत. यामुळे परिसरातील रहिवाश्यांना मात्र त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.
टिळक मार्केटच्या बाहेर रस्त्यांवर दुकाने, चार चाकी बंड्या लावून भाजी तसेच फळ विक्रेते व्यवसाय करताना दिसतात. त्यांच्या पाठोपाठ अन्य वस्तूंचीही दुकाने रस्त्यावरच लावली जातात. यामुळे रस्ते अत्यंत निमूळते झाले आहेत. टिळक मार्केटच्या गेटजवळ असलेल्या झाडाच्याही पूढे दुकाने थाटली जातात. ही दुकाने रस्त्याच्या अगदी मधोमध येतात. यामुळे तेथून वाहने घेऊन जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार बाजारातील एक-दोन रस्त्यांवर असता तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते; पण बाजारातील प्रत्येकच ओळीमध्ये अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटली जातात. यामुळे सामान्यांना ये-जा करताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याकरिताही जागा शिल्लक राहत नाही. बाजारात गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी वाहने उभी करून संपूर्ण बाजार पायी पिंजून काढावा लागतो. अन्यथा वाहनांच्या गर्दीत ताटकळावे लागते. गोल बाजारातून सराफ लाईन, पत्रावळी लाईन व अन्य चौकांकडे जातानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सराफ लाईन परिसरात रस्त्यापर्यंत दुकाने असून तेथेच वाहनेही उभी केली जातात. या परिसरात कुठेही पार्किंगसाठी जागा नाही. यामुळे नागरिकांची गोची होते.
श्री राम मंदिर तसेच परिसरातील प्रत्येकच रस्त्यावर दुकाने असून ती अतिक्रमणात थाटण्यात आली आहेत. केवळ चार चाकी बंड्याच लावल्या नाही तर त्या कायम राहतील, अशी व्यवस्थाही अनेक विक्रेत्यांनी केल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यास लक्षात येते. एका बाजूला पक्की दुकाने आणि दुसऱ्या बाजूने अतिक्रमण करून थाटलेली दुकाने, यामुळे ये-जा करण्याकरिता रस्ताच शिल्लक राहत नाही. या प्रकारामुळे गोल बाजार तसेच परिसरातील प्रत्येक ओळींमध्ये गर्दीच दिसते. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Encroachment market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.