‘त्या’ कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण सुरू
By Admin | Updated: July 28, 2014 23:40 IST2014-07-28T23:40:19+5:302014-07-28T23:40:19+5:30
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ईलेक्ट्रिशीयन पदावर कार्यरत कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले़ याविरूद्ध सदर कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला

‘त्या’ कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण सुरू
हिंगणघाट बाजार समितीमधील प्रकरण
वर्धा : हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ईलेक्ट्रिशीयन पदावर कार्यरत कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्यात आले़ याविरूद्ध सदर कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे़ पुन्हा कामावर घेऊन मागण्या मान्य केल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका सदर कर्मचाऱ्याने घेतली आहे़
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इलेक्ट्रिशीयन पदावर कार्यरत अनंता दादाजी साटोणे (४४) या कर्मचाऱ्यास १७ वर्षांच्या सेवेनंतर बडतर्फ करण्यात आले आहे़ कामात हयगय करीत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता़ या निर्णयाविरूद्ध साटोणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे़ याच प्रकरणात यापूर्वी साटोणे यांना १७ महिने निलंबित ठेवण्यात आले होते़ त्यावेळीही उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सात दिवस उपोषण केल्यानंतर परत कामावर घेण्यात आले़ स्थायी कर्मचाऱ्यांनाही बाजार समितीत त्रास दिला जात असून वेतनवाढी देण्यात हयगय केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे़ बडतर्फीचा आदेश मागे घ्यावा, १ जुलै २००४ पासूनची स्थायी नियुक्ती मान्य करावी, २००० पासून पाचवे वेतन आयोगाचे अॅरिअर्स देण्यात यावे, २०११ व १२ ची वेतनवाढ देण्यात यावी, २००९ पासूनचे सहावे वेतन आयोग लागू करून त्याचे अॅरिअर्स द्यावे आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत़ याबाबत साटोणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री, गृहमंत्री व अन्य लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठविले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)